'मारा, लेकीन सॉलिड नही मारा!'

"मारा, लेकीन सॉलिड नही मारा !' 
"मारा, लेकीन सॉलिड नही मारा !' 

राज्यात महापालिकांच्या निवडणुका होत असल्या तरी महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लक्ष मुंबईकडे लागून राहिले आहे. कोण जिंकणार मुंबई. शिवसेना की भाजप? असा प्रश्‍न केला जात असताना दुसरीकडे मराठीच्या मुद्यावर लढणारी मनसे मात्र डेंजर झोनमध्ये गेल्याचे दिसून येत आहे. या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेवर आगपाखड करून मुंबईकरांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. 

भाजपचा मुंबई तोडण्याचा डाव आहे तर युती करण्यासाठी मी शिवसेनेपुढे हात केला होता. मराठी मतांमध्ये दुफळी निर्माण होऊ नये यासाठी मातोश्रीवर सात वेळा फोन केला होता. हे पुन्हा एकदा सांगण्यास राज हे विसरले नाहीत. मुंबईतील मराठी माणसाला या घडीला तरी शिवसेनाच सर्वांत प्रिय वाटत असल्याचे एकंदर वातावरणावरून दिसून येत आहे. त्यामुळे मराठीच्या मुद्यावर शिवसेनेवर टीकेचे कितीही प्रहार केले तरी शिवसेनेची प्रतिमा डागळणार नाही हे दिसून येते. ज्या ज्या वेळी मुंबई आणि मराठीचा मुद्दा उपस्थित होतो. तेव्हा तेव्हा मुंबईतील मराठी माणूस शिवसेनेच्याच मागे खंबीरपणे उभा राहिलेला दिसून येत आहे. या निवडणुकीतही तसेच चित्र दिसून येत आहे. कॉंग्रेसचे जे मुख्यमंत्री होऊन गेले त्यापैकी काहीजणांनी निवडणुकीच्या तोंडावर वादग्रस्त विधान करून शिवसेनेला कसा फायदा होईल हे पाहिले. आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र कोणत्याही परिस्थिती शिवसेनेचा पराभव करण्यासाठी जिद्दीने मैदानात उतरले आहेत. त्यामुळे खरी लढत फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातच होणार आहे. अर्थातच राज ठाकरे हे नाव सर्वपक्षांच्या तुलनेत अगदी शेवटच्या क्रमांकावर फेकले गेले आहे. 

गेल्या महापालिका निवडणुकीत मनसेची जी हवा होती ती आता पार ओसरली आहे. या पक्षाचे 27 नगरसेवक निवडून आले होते त्यापैकी आता कितीजण निवडून येतील हे काही सांगता येत आहे. गेल्यावेळी शिवसेनेचा बाल्लेकिला असलेल्या दादरमध्ये मनसेने मुसंडी मारून नगरसेवक निवडून आणले होते. यावेळी हा बाल्लेकिला टिकविण्यासाठी राज हे प्रयत्न करीत आहेत. म्हणूनच दादरमधील शिवाजी मंदिरात त्यांनी मनसेचा मेळावा घेतला. या मेळाव्याला जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायला हवा होता तो मिळालेला दिसून येत नाही. मुळात बाळासाहेब ठाकरे काय किंवा स्वत: राज काय ? ठाकरे फॅमिली दादरकर म्हणूनच ओळखले जातात. आता जरी मातोश्री हे सत्तेचे केंद्र असले तरी. दादरमध्ये यावेळी शिवसेना चमत्कार करून दाखविते का ? याकडे मुंबईकरांचे लक्ष आहे. 

विरोध का ? 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ज्यापद्धतीने शिवसेनेने विरोध केला त्याच प्रमाणे मनसेनेही आपले लक्ष्य मोदी हेच ठेवले होते. मोदींच्या झंझावातामुळे मनसेची गोची झाल्याने राज यांनी नेहमीच भाजप सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयला विरोध केला आहे. मग तो नोटाबंदीचा निर्णय असो की मोदींचे परदेश दौरे असोत. तसेच दुसरीकडे शिवसेनेलाही त्यांनी इतके दुखावले आहे की मनसेने कितीही टाळी मागण्याचा प्रयत्न केला तरी शिवसेना ती देईल असे वाटत नाही. राज ठाकरे हे दोन अडीच लाखाच्या ज्यावेळी जाहीरसभा घेत होते त्या सभा आठवत असतील तर ते उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर काय बोलत होते याची आठवण शिवसेना नेत्यांना आहे. झाले गेले विसरून राज यांनी शिवसेनेशी स्वत:हून युती करण्याची तयारी दाखविली हे खरे तर चांगले पाऊल होते.बलाढ्य भाजपविरोधात लढण्यासाठी ठाकरे बंधूनी हातात हात घालून मैदानात उतरायला हवे होते. तसे झाले असते तर मराठी माणसांनी या निर्णयाचे स्वागत केले असते. पण, उद्धव हे कच्च्या गुरूचे खेळाडू नाही. राजकारणात कोणी कोणाचा नसतो. त्याप्रमाणे डेंजर झोनमध्ये असलेल्या मनसेला ते संजीवनी देणार नाहीत. जर मनसे-शिवसेना युती निवडून आली तर पुढे पाच वर्षे मनसेची डोकेदु:खी वाढणार हे शिवसेना नेत्यांनाही चांगले ठाऊक आहे. या सर्व घडामोडींचा विचार करून त्यांनी टाळी दिली नाही. तसेच भाजप बलाढ्य असला तरी युती तोडल्याने शिवसेनेविषयी थोडी सहानुभूती मतदारांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे आपण सहज बाजी मारू असा आत्मविश्वास शिवसेनेत निर्माण झाल्याने त्यांनी मनसेला टाळी दिली नसावी. सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यापूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मनसेने जाणीवपूर्वक शिवसेनेचे उमेदवार पाडले होते. कॉंग्रेसवाले जिंकल्याचा आनंद मनसेला नव्हता तर शिवसेनेचे उमेदवार पाडल्याचा होता. शिवसेनेने याचा खूप विचार केलेला दिसतो. 

उद्या जरी शिवसेना स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही असे दिसू लागल्यास ते भाजपलाही सोबत घेऊ शकतात. तसेच भाजपही शिवसेनेला बरोबर घेऊ शकतो. भविष्यात नेमके काय होईल हे सांगता येत नाही. यापुढे शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा नारा दिला असला तरी तो किती टिकतो हे महापालिका निवडणुकीनंतर स्पष्ट होईल. त्यामुळे मनसेला सध्या तरी भाजप किंवा शिवसेना जवळ करेल असे दिसत नाही. मनसे स्वबळावर लढली तरी त्याचा फार मोठा तोटा शिवसेनेला होईल असे वाटत नाही. "एकही मारा, लेकिन सॉलिड मारा' हा राज यांनी दिलेला पंच उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना कशी विसरेल. तसेच राज यांनी कालच्या सभेत भाजप आणि शिवसेनेला जो सॉलिड मार द्यायला हवा होता तो दिला नाही असे वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com