फडणवीस मावळते मुख्यमंत्री; शिवसेनेचा जहरी वार

वृत्तसंस्था
Tuesday, 5 November 2019

महाराष्ट्रात लवकरात लवकर नवे सरकार स्थापन होणे हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तितकेच ते राज्याच्या मऱहाटी जनतेसाठी महत्त्वाचे आहे. पण सत्तास्थापनेचा घोळ घालायचा व त्या परिस्थितीचा लाभ घेऊन सरकार नसतानाही अप्रत्यक्ष सूत्रे हातात ठेवून राज्यकारभार हाकायचा हे घटनाविरोधी आहे.

मुंबई : नवे राज्य मोकळ्या वातावरणात यावे, पण एकदाचे राज्य यावे हीच अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या जनतेने ‘कौल’ दिला आहे. दिल्लीच्या गढूळ वातावरणातून मावळते मुख्यमंत्री महाराष्ट्रात उतरतील तेव्हा त्यांना पुढचे पाऊल टाकावेच लागेल. त्यांच्या पावलावरच राज्याची पुढची दिशा ठरेल. सध्या आम्हाला चिंता आहे ती ओल्या दुष्काळाची आणि महागलेल्या भाजीपाल्याची, अशी जहरी टीका शिवसेनेने केली आहे.

शिवसेनेने 'सामना' या मुखपत्राच्या अग्रलेखातून भाजपला सत्तास्थापनेवरून पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. दिल्लीत असलेल्या मुख्यमंत्र्यांना शिवसेनेने मावळते मुख्यमंत्री अशी उपमा दिली आहे. मुख्यमंत्रिपद असेल किंवा काही महत्त्वाची खाती असतील यावरून शिवसेना आणि भाजपामधील वाद अद्यापही सुटला नाही. भाजप मुख्यमंत्रिपद शिवसेनेला न देण्यावर ठाम आहे. तर दुसरीकडे शिवसेना अडीच अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मिळवण्यावर ठाम आहे. अशातच दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

शिवसेनेने म्हटले आहे, की महाराष्ट्रात लवकरात लवकर नवे सरकार स्थापन होणे हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तितकेच ते राज्याच्या मऱहाटी जनतेसाठी महत्त्वाचे आहे. पण सत्तास्थापनेचा घोळ घालायचा व त्या परिस्थितीचा लाभ घेऊन सरकार नसतानाही अप्रत्यक्ष सूत्रे हातात ठेवून राज्यकारभार हाकायचा हे घटनाविरोधी आहे. देशात आणि आपापल्या राज्यात काय घडत आहे हे जाणून घेण्याचा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. लोकशाहीतील तो पहिला धडा असतो. सध्या महाराष्ट्रात काय चालले आहे हे जाणून घेण्याची धडपड संपूर्ण देशात सुरू आहे. भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाचे नेते व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहा यांना भेटले व त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सदनाबाहेर पत्रकारांना सांगितले की, ‘महाराष्ट्रात सरकार स्थापन होणार व आपण स्वतः मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार.’ मुख्यमंत्र्यांच्या या शब्दांमुळे राज्यातील गुंता सुटेल व एक सरकार मिळेल असे समजायला हरकत नाही. मुख्यमंत्री अमित शहा यांना भेटून सरकार स्थापण्याचे भाष्य करतात म्हणजे नक्कीच त्यांनी जुळवाजुळव केली असेल व बहुमताचा आकडा वस्त्रगाळ करून जमवला असेल. जेव्हा अंतःकरण भरून येते तेव्हा आपल्या मनातील भावना आणि कल्पना व्यक्त करावयास शब्द अपुरे पडतात असे काहीसे मा. मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत दिसले. दिल्लीची हवा सध्या प्रदूषित आहे. धूळ व इतर विषारी द्रव्ये त्या हवेत पसरून सर्वत्र काळोख असल्यासारखे चित्र दिसत आहे. लोक धड पाहू शकत नाहीत व श्वास घेऊ शकत नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena attacks agian CM Devendra Fadnavis in Saamana editorial