शिवसेना भाजपला म्हणतेय "पहले आप'

मृणालिनी नानिवडेकर
गुरुवार, 12 जानेवारी 2017

युतीबाबत बलशाली भाजपत नवा विश्‍वास; मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकार

युतीबाबत बलशाली भाजपत नवा विश्‍वास; मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकार
मुंबई - मुंबई महापालिका म्हणजे शिवसेनेचे प्राण; पण यासंबंधात कोणतीही घिसाडघाई न करता भाजपचा प्रस्ताव पाहिल्यानंतरच आकड्यात बोलण्याचे धोरण शिवसेनेने स्वीकारले आहे. संपूर्ण राज्यात ताकद वाढल्याने भाजप या वेळी मोठा वाटा मागेल, हे लक्षात घेत प्रथम प्रस्ताव तर ठेवा, नंतर काय ते बोलू, असे धोरण शिवसेनेने स्वीकारले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचा एक फॉर्म्युला आपल्याकडे असल्याचे विधान केले आहे. वेगळे लढून कालांतराने सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेनेला स्वत:ची आक्रमक प्रतिमा जपायची असल्याने मुंबईत कल्याण-डोंबिवलीची पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता व्यक्‍त करण्यात येते आहे. नागरी भागातले वातावरण अनुकूल असले, तरी ग्रामीण भागात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या युतीच्या बरोबरीची आहे. त्यामुळे निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाण्याचा प्रस्ताव भाजपमधून पुढे आला आहे. त्यातच केंद्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वाधिकार दिल्याने त्यांनी कोणत्याही एकत्र सरकारचा पारदर्शकता हा पाया असेल, हा निरोप पाठवला आहे.

मुंबईत प्रत्येक निवडणुकीप्रमाणे भाषक आधारावर मतदान झाल्यास मुख्य शहरात सेनेला फायदा होणार हे निश्‍चित आहे. मात्र उत्तर भारतीय आणि गुजराती मतांची संख्या लक्षात घेता उपनगरात भाजपला मोठा लाभ होईल. विधानसभा निवडणुकीत भाजपने सेनेपेक्षाही अधिक जागा जिंकल्या आहेत. मराठी मतदारांतील दहा टक्‍के मतदारही भाजपकडे वळल्यास निर्णायक आघाडी मिळू शकते, असा भाजपचा अंदाज आहे. मात्र सहकारी पक्षाशी दोन हात करण्याऐवजी सध्या राज्यातील जनाधार एकत्र करणे आवश्‍यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत आहे.

नवी दिल्लीने यासंदर्भात फडणवीस यांच्यावर संपूर्ण विश्‍वास टाकल्याने युतीच्या चर्चेला प्रारंभ होणार, हे निश्‍चित झाले आहे. शिवसेनेने ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई आणि राज्यसभा सदस्य अनिल देसाई यांना युतीच्या चर्चेचे सर्वाधिकार दिले आहेत. आज भाजपचे मुंबई विभागीय अध्यक्ष आशीष शेलार यांना समोर करून युतीच्या प्रस्तावावर चर्चा सुरू होईल, असे जाहीर केले. सेनेनेही चर्चा करण्याची तयारी दाखवली असली, तरी विधानसभा निवडणुकीत भाजपने आघाडी मिळविलेल्या 105 वॉर्डांची संख्या मोठी असल्याने अर्धी मुंबई भाजपच्या हवाली करण्याबाबत सेनेत वेगवेगळी मते आहेत. विधानसभेनंतर वॉर्डांची फेररचना झाली असल्याने हा आधार कसा मानणार, असाही प्रश्‍न आहे. सैनिकाला लढाई आवडते हे गृहीत धरले, तर सेना चिवटपणे मैदानात उतरेल असे दिसते. मात्र मुंबईच्या बदललेल्या स्वरूपामुळे अमराठी मते भाजपच्या मागे उभी राहतील. सेनेची मते भाजप उमेदवाराकडे वळत नसल्याने युतीसाठी झुकू नका, असे भाजप कार्यकर्त्यांचे मत आहे.

Web Title: shivsena bjp alliance in election