Loksabha 2019 : युतीचे उमेदवार 'डेंजर झोन'मध्ये 

Shiv Sena, BJP
Shiv Sena, BJP

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती झाली असली, तरी नेत्यांचे मनोमिलन अद्याप झालेले नाही. त्यामुळे राज्यातील युतीच्या अनेक जागा "डेंजर झोन'मध्ये असल्याचे सध्याचे चित्र आहे. 

लोकसभा निवडणूक लढण्यासाठी महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आले आहेत. जागावाटप झाले असले; तरी स्थानिक पातळीवरील राजकारण, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते, यामुळे काही जागा युतीसाठी आव्हानात्मक राहणार आहेत. राज्यातील काही जागांवर दोन्ही पक्षांच्या समर्थकांमधून विस्तवही जात नाही, अशी स्थिती आहे. अनेक ठिकाणी शिवसेना-भाजपातील विस्तवही जात नाही, अशी अवस्था आहे; तर शिवसेना आणि भाजपअंतर्गतही वाद आहेत. 

चंद्रपूरमध्ये केंद्रीय मंत्री हंसराज अहिर खासदार आहेत. ते चारवेळा या ठिकाणाहून निवडून आले आहेत. या वेळी त्यांच्याविरोधात कॉंग्रेसचे उमेदवार सुरेश धानोरकर असणार आहेत. ते शिवसेनेचे आमदार होते. निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा देत ते कॉंग्रेसमध्ये सामील झाले. दुसरीकडे, याच मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या विधानसभेच्या जागेवर आमदार आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार हेदेखील येतात. मुनगंटीवार आणि अहिर यांच्यातही दुरावा असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. अशावेळी जागा जिंकण्यासाठी भाजप आणि शिवसेनेला अंतर्गत लढाई संपवावी लागणार आहे. 

यवतमाळ-वाशिममध्ये शिवसेनेत अंतर्गत लढाई आहे. इथे खासदार भावना गवळी पाचव्यांदा निवडून येण्यासाठी लढणार आहेत. राज्य सरकारमधील मंत्री संजय राठोड आणि गवळी या दोघांमध्ये मराठा विरुद्ध बंजारा असा संघर्ष आहे. आजच आदित्य ठाकरे यांनी राठोड-गवळी यांच्यातील वाद मिटल्याचे म्हटले आहे. दुसऱ्या बाजूस या ठिकाणी सत्तेविरोधी वारेदेखील जोरात दिसत आहे. 

अमरावती मतदारसंघात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ तिसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात आहेत. या जागेवर कॉंग्रेस आणि "राष्ट्रवादी'च्या नवनीत कौर राणा त्यांना शह देतील. अशावेळी इथली लढत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. नवनीत या अपक्ष उमेदवार रवी राणा यांच्या पत्नी आहेत; जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. या ठिकाणी शिवसेना आणि भाजप अंतर्गत राजकारणामुळे त्रस्त आहे. बुलडाण्यात शिवसेनेच्या प्रताप जाधव यांच्यावर माजी आमदार विजयराज शिंदे नाराज आहेत. 

नाशिक मतदारसंघातही हीच अवस्था आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार गोडसे यांच्याविरोधात भाजपकडून बंडखोरी केली जाण्याचे सूतोवाच आहेत. दिंडोरी मतदारसंघात "राष्ट्रवादी'तून आयात उमेदवाराला भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माजी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण आणि त्यांचे समर्थक भाजपवरच खवळले आहेत. नगर दक्षिण मतदारसंघात सुजय विखे यांना तिकीट दिल्याची बाब विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना रुचलेली नाही. त्यांच्या पुत्राने अपक्ष म्हणून भरलेला अर्ज मागे घेतला असला, तरी त्यांची दुखावलेली मने कायम आहेत. जळगाव मदारसंघात तर एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील संघर्षाचा बळी स्मिता वाघ ठरल्या आहेत. पक्षाने तिकीट देऊनही ऐनवेळी माघार घेण्यास सांगितल्याने वाघ आणि त्यांच्या समर्थकांनी महाजन यांच्या निवासस्थानावर गोंधळ घातला आहे.

भिवंडी मतदारसंघात भाजप खासदार कपिल पाटील आणि शिवसेनेत बेबनाव आहे. या वातावरणामुळे युतीचे उमेदवार अनेक ठिकाणी "डेंजर झोन'मध्ये असल्याचे चित्र आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com