शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सत्ताधाऱ्यांचीच घोषणाबाजी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

सत्ताधाऱ्यांनी उपरती कशी - अजित पवार
कर्जमाफीच्या मागणी करणाऱ्या सत्ताधारी आमदारांना अचानक उपरती कशी झाली, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपस्थित केला. 

मुंबई - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून विधीमंडळात विरोधी पक्षाचे आमदार सरकारविरोधात घोषणाबाजी करताना दिसतात, मात्र आज (गुरुवार) सत्तेतील शिवसेना आणि भाजपचे आमदारच कर्जमाफीसाठी घोषणाबाजी करताना दिसले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन विधानसभेत गदारोळ झाला. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, अशा घोषणा शिवसेना आमदारांनी सभागृहात दिल्या. 

आधी शिवसेना आमदारांनी घोषणाबाजीने सभागृह दणाणून गेले. शिवसेना आमदारांनी वेलमध्ये उतरण्याचा प्रयत्न केला. मग भाजप आमदारांनीही आक्रमक पवित्रा घेत, त्यांनीही शेतकरी कर्जमाफीसाठीच घोषणाबाजी सुरु केली. या गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज दुपारी 12 पर्यंत तहकूब करण्यात आले.

यानंतर मग शिवसेना आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर घोषणाबाजीला सुरुवात केली. मग भाजप आमदारांनीही विधानभवनाच्या पायऱ्यांवर शेतकरी कर्जमाफीसाठी घोषणाबाजी केली. मंत्री वगळून सर्व पक्षाचे आमदार शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी एकवटल्याचे पहायला मिळाले.

भाजप आमदारांनी मागणी करत म्हटले, की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करून खऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. विरोधी पक्षातले नेते नाटक करतात. शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. 100% कर्ज माफ व्हावी ही भाजपची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती की खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, बोगस बँकधारकाना कर्जमाफी देऊ नये.

तर, शिवसेनेच्या आमदारांनी म्हटले, की राज्यात शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतमालाला भाव मिळत नाही. भाजपचा विजयाचा वारु उधळला असला तरी शेतकऱ्यांची परिस्थिती तशी नाही. शेतकरी कर्जमुक्त होत नाही, तोपर्यंत सेनेचा लढा सुरु राहिल. भाजप कुणाकडे कर्जमुक्ती मागत आहे? हे राजकीय षडयंत्र आहे. आमचे मंत्री सरकारशी चर्चा करतात पण त्यांना यश येत नाही. महापौर निवडणूक आणि आज आंदोलन केले याचा संबंध नाही. शेतकऱ्यांचे राजकारण आम्ही करत नाही.

सत्ताधाऱ्यांनी उपरती कशी - अजित पवार
कर्जमाफीच्या मागणी करणाऱ्या सत्ताधारी आमदारांना अचानक उपरती कशी झाली, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपस्थित केला. 

 

Web Title: shivsena bjp MLAs protest for farmer loan waiver