शिवसेनेच्या आगळिकीकडे भाजप करणार दुर्लक्ष

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 डिसेंबर 2018

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणमधील कार्यक्रमांच्या स्वागताचे फलक लावल्यानंतर अचानक आलेल्या आदेशामुळे शिवसेना नेत्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, तरी भाजपने यासंदर्भात मौन बाळगणेच पसंत केले आहे. पुण्यात पंतप्रधान मोदी यांनी हे तर शिवसेनाप्रमुखांचे जन्मस्थान असल्याचा उल्लेख करीत शिवसेना आपल्याला समवेत हवी असल्याचे स्पष्ट केले. कोस्टल रोडच्या भूमिपूजन समारंभाला भाजपचे नेते आमंत्रण असून आले नाहीत, त्यामुळे आम्ही आज गेलो नाही, असे स्पष्ट करीत शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने यासंदर्भात काहीही बोलणे टाळले. मात्र, दोन्ही बाजूंनी हे प्रकरण मोठे करायचे नाही, असे ठरवल्याचे चित्र आहे.

शिवसेनेने स्थानिक नेत्यांनी या कार्यक्रमाला हजर राहू नये, असे मातोश्रीवरून कळवण्यात आले. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही शिवसेना नेते कार्यक्रमास हजर राहणार नसल्याचे कळवण्यात आले होते, असे सांगण्यात येते आहे. आगामी काळात काय करायचे, वेगळे लढण्याच्या भूमिकेवर ठाम राहायचे का? याबद्दलचा निर्णय नंतर होणार असला, तरी भाजपशी मागील दरवाजाआडून चर्चा सुरू ठेवणे मात्र सुरू ठेवावे, असा शिवसेनेचा सूर आहे.

कार्यक्रम एमएमआरडीएचा ...
आम्ही निमंत्रण दिले असताना बहिष्कार टाकला गेला असे नाही, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. कार्यक्रम आमचा नव्हता, तर तो "एमएमआरडीए'चा होता, असेही सांगण्यात येते आहे. कोस्टल रोडचा कार्यक्रमही शिवसेनेचा नव्हता, तर मुंबई महापालिकेचा होता, असे आता याच न्यायाने स्पष्ट केले जाईल.

Web Title: Shivsena BJP Politics