शिवसेनेचे ‘दबावास्त्र’!

Shivsena
Shivsena

मुंबई - ‘महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ होती व राहणार. दिल्लीचे तख्तदेखील हा मोठा भाऊ गदागदा हलवणार. संसदेत केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेना खासदार आवाज उठवणार. ‘राफेल’बाबत नवी माहिती शिवसेनेकडे आहे...’ अशी साहसी विधाने करत शिवसेनेने भाजपवर ‘दबावास्त्र’ डागण्याचा आज प्रयत्न केला.

‘‘युतीच्या बाबतीत कोणताही प्रस्ताव भाजपने दिलेला नाही. शिवसेना निवडणुकांसाठी सक्षम आहे,’’ असे स्पष्ट करत खासदार संजय राऊत यांनी ‘स्वबळ’ हा शब्द टाळत युतीबाबत सावध भूमिका घेतली. मातोश्रीवर आज शिवसेना खासदारांची महत्त्वाची बैठक उद्धव ठाकरे यांनी बोलावली होती. ‘‘ही बैठक युतीच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी नव्हती, तर आगामी संसदेचे अधिवेशन एक फेब्रुवारीला सुरू होणार असून, केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेना खासदार विविध प्रश्‍नांवर आवाज उठवणार असल्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिले,’’ असे राऊत म्हणाले. 

सामान्य नागरिकांना दिलासा द्यायचा असेल, तर सरकारने प्राप्तिकराची मर्यादा आठ लाख रुपयांपर्यंत वाढवावी. आठ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्‍त करण्याचा निर्णय या अधिवेशनातच घ्यावा, अशी मागणी शिवसेना संसदेत करणार असल्याचे या बैठकीत ठरल्याचे राऊत यांनी सांगितले. 
केंद्र सरकार प्राप्तिकरची मर्यादा वाढवू शकते अशी चर्चा असल्याने आठ लाखांपर्यंत ती वाढवावी अशी मागणी करून शिवसेनेने भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.

सर्वाधिकार उद्धव ठाकरेंकडे
आजच्या खासदारांच्या बैठकीत युतीबाबत उद्धव ठाकरे यांच्यासोबत जुजबी चर्चा झाली. मात्र, ही बैठक युतीच्या प्रस्तावाची नव्हती. युती करण्याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. आगामी अर्थसंकल्पी अधिवेशनात शिवसेना राफेल खरेदीवर आवाज उठवणार असल्याचा इशाराही राऊत यांनी या वेळी दिला. राफेलबाबत शिवसेनेकडे नवीन माहिती असल्याचा दावा करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य करण्यात येणार असल्याचे त्यांनी सूचित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com