शिवसेनेला हवे अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद

Shivsena
Shivsena

मुंबई - पंतप्रधान भाजपचा, तर मुख्यमंत्री आमचा अशी नवी भूमिका शिवसेनेने जाहीरपणे मांडली असली तरी प्रत्यक्षात अडीच अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद अशी चर्चेची पूर्वअट पुढे करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील नव्या विधानसभेत पहिल्या अडीच वर्षात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असे आश्‍वासन द्यावे, अशी आग्रही मागणी पुढे करण्यात येणार असल्याचे विश्‍वसनीयरीत्या समजते. 

लोकसभेच्या निवडणुकांबरोबरच विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर, भाजपला वचनभंगाची संधी मिळणार नाही, अशी शिवसेनेतील जहाल गटाची भूमिका आहे. तडजोडीचा फॉर्म्यूला म्हणून आगामी सहा महिन्यांसाठी याच कार्यकाळात उपमुख्यमंत्रिपद मागावे अशा ‘विनम्र’ सूचनाही काही इच्छुकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केल्या असल्याचे समजते. लोकसभेसाठी ‘२४ : २४’ या सूत्रावर शिवसेना ठाम आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप पडते घेत बिहारप्रमाणे मित्रपक्षाला झुकते माप देईल, अशी शिवसेनेला खात्री आहे. मात्र केंद्रात अनुकूल निकाल लागल्यास विधानसभेत पुन्हा एकदा विश्‍वासघाताचे धोरण अमलात येईल, अशी भीती मातोश्रीवर आज झालेल्या बैठकीत व्यक्‍त करण्यात आली. विधानसभेच्या २८८ जागांपैकी १९९५ च्या फॉर्म्युलानुसार शिवसेनेला १६९ मतदारसंघांत लढण्याची संधी द्यावी, अशी मागणीही खासदार संजय राउत यांनी जाहीरपणे केली आहे. प्रत्यक्षात १४४  मतदारसंघात लढण्याची संधी मिळाल्याशिवाय युती करू नये, तसेच अडीच वर्षांची पहिली संधी ही पूर्वअट घालावी, असा आग्रह आहे.

भाजपने महाराष्ट्रातील घटक पक्षांसाठी २८८ पैकी २० जागा सोडाव्यात असा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी शिवसेनानेतृत्वाकडे पाठवला होता. मात्र, या वीसही जागा भाजपने त्यांच्या कोट्यातून द्याव्यात, ते भाजपचे मित्र आहेत. आम्ही एकटेच लढण्याची ताकदही राखून आहोत, असे शिवसेनेने कळवले आहे. लोकसभा मतदारसंघातही समसमान संधी हवी, राज्यात आम्ही मोठा भाऊ असल्याने ही मागणी योग्यच असल्याचे शिवसेनेचे मत आहे. 

शिवसेनेतील काही ज्येष्ठ मंत्र्यांनी मात्र पक्षाचे संघटनात्मक कार्य काही विशिष्ट भागापुरतेच मर्यादित असल्याने २४ जागांचा आग्रह धरू नये, असे मत नोंदवले आहे. शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांशी आज उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली, युतीचा निर्णय लवकरात लवकर घ्या यासाठी भाजप शिवसेना या दोघांशी उत्तम संबंध असलेले काही महत्त्वाचे लोक प्रयत्न करीत आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या वाढीव ताकदीची शिवसेनेने जाणीव ठेवावी, असे भाजपचे मत आहे, तर मोदींना विजयासाठी आमची गरज आहे, असे शिवसेनेला वाटते. सन्मानजनक तोडगा म्हणून लोकसभेच्या काही जागा दिल्या जातील; मात्र त्या भाजपने जिंकलेल्या विद्यमान मतदारसंघातील नसतील, असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. मात्र अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद बहाल करणे सर्वस्वी कठीण आहे. जागांवर चर्चा होऊ शकते; पण ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हेच सूत्र अमलात येईल, असे एका भाजपच्या मंत्र्याने नमूद केले. शिवसेनेने त्यांची विद्यमान ताकद लक्षात घेत योग्य अपेक्षा ठेवाव्यात, अशी पुस्तीही या नेत्याने जोडली.

उद्धव ठाकरे-मुख्यमंत्री चर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हेही त्यांच्यासोबत होते. नाणारची अधिसूचना रद्द का करत नाही, तसेच अयोध्येचा मुद्दा सोडवत का नाही, असे प्रश्‍न उद्धव ठाकरे यांनी या वेळी उपस्थित केल्याचे समजते. त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली. आता दोन दिवसांनी पुन्हा चर्चा होणार आहे. चर्चा सकारात्मक झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी नंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com