आता शिवसेनेचाच मुख्यमंत्री !

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 जून 2018

मुंबई - 'शिवसेना सत्तेत असली तरी माज करत नाही. शिवसेनेला आव्हान द्यायला जे कोणी समोर येतील त्यांच्या छाताडावर महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री बसवून दाखवणार,'' असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला. शिवसेनेला सत्तेची लालसा नाही. सत्तेत असतानाही सामान्य जनतेच्या प्रश्‍नासाठी सरकार विरोधात रस्त्यावर उतरण्याची हिम्मत शिवसेनेने दाखवली आहे, अशी टोलेबाजी करत शिवसेनेच्या 52 व्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी रणशिंग फुकले.

या राज्यस्तरीय मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'आम्ही जिंकलो म्हणून माजलो नाही, तर हरलो तरी खचलो नाही. शिवसेनेने अनेक आव्हानांचा सामना करत 52 वर्षांची यशस्वी वाटचाल केली आहे. आम्हाला जो आव्हान द्यायला समोर येईल त्यांचे आव्हान मोडून काढण्याची धमक शिवसैनिकांत असून केवळ "मिसकॉल' देऊन पक्षाचे सदस्य होता येत नाही तर त्यासाठी जनमानसात जाऊन शिवसैनिक सदस्य नोंदणी करतील. याच प्रामाणिक शिवसैनिकांच्या हिमतीवर महाराष्ट्रात सर्वत्र भगवा फडकवून शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणार.''

भाजपच्या संपर्क अभियानाची खिल्ली उडविली. 'प्रसिद्ध लोकांच्या घरी जाण्यापेक्षा सामान्य जनतेत जाऊन सरकारच्या योजनांचे सत्यशोधन करा. जे फडणवीस सरकार जाहिरातीवर सामान्य जनतेच्या खिशातील चार हजार कोटी रुपये खर्च करतेय त्या सरकारच्या योजनांचे सत्य बाहेर काढा,'' अशा शब्दांत ठाकरे यांनी शिवसैनिकांना आदेश दिला.

फुटीसाठी पगडीचे राजकारण
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना पुणेरी पगडी काढून फुले पगडी दिल्याच्या घटनेचाही ठाकरे यांनी समाचार घेतला. मराठी माणसांत फूट पाडण्यासाठी पवार पगडीचे राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केली. अनेक लोकांमुळे पगड्या प्रसिद्ध झाल्या. सर्वच पगड्यांची परंपरा महाराष्ट्रात आहे. पण, पगडीचे राजकारण करायचेच असेल तर फुले-शाहू-टिळक-आगरकर यांसारख्या दैवतांच्या पगड्या वापरू नका, असे ठाकरे यांनी आवाहन केले.

मोदीचे परग्रहावर दौरे होतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरावर उडती तबकडी फिरत असल्याच्या बातमीची ठाकरे यांनी खिल्ली उडवली. अशाप्रकारची तबकडी मोदी यांच्या घरावर येत असेल तर आता लवकरच मोदी परग्रहावर दौरे काढण्यास सुरवात करतील, अशी कोपरखळी ठाकरे यांनी लगावली.
दरम्यान, दहशतवाद्यांना कुठलाही धर्म नसतो तर मग रमजानच्या काळात शस्त्रसंधी का केली? असा सवाल करत, गणेशोत्सव व दिवाळीच्या सणामध्ये सरकार कधी शस्त्रसंधी करते का? केंद्र सरकार केवळ धर्माचे राजकारण करत असल्याचा आरोपही ठाकरे यांनी या वेळी केला.

Web Title: shivsena chief minister uddhav thackeray politics