
Eknath Shinde : टाळ्या पडत होत्या म्हणून गुलाबराव, कदमांची भाषणे बंद केली; शिंदेंचा गौप्यस्फोट
मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील खेडमध्ये आयोजित केलेल्या उत्तर सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. एकनाथ शिंदें यांनी आयोजित केलेल्या सभेला देखील मोठी गर्दी झाली असून यावेळी शिंदे यांनी अनेक मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
शिंदे म्हणाले, की, उध्दव ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली होती. अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती. मग आता तुम्ही त्यांच्यासोबत काय करत आहात. पक्षातील अनेक नेत्यांनी घरादाराची पर्वा न करता तुमच्यासोबत आले. तुम्ही या नेत्यांना गद्दार म्हणता. माझ्यावर १०९ केसेस आहेत. तुम्ही काय केलं, असा सवालही शिंदे यांनी ठाकरेंना विचारला.
शिंदे पुढं म्हणाले की, रामदास कदमांना संपविण्याचा प्रयत्न केला. तुमचा रामदास भाईसोबत वाद असू शकतो, पण योगेश कदमने तुमचं काय घोडं मारलं. त्याचं राजकारण नुकतचं सुरू झालं. त्याने तुमचं काय वाईट केलं, तुम्ही त्याला संपवायला का निघाला, असा प्रश्नही उपस्थित केला. तसेच मनोहर जोशींना तुम्ही स्टेजवरून खाली उतरवलं होतं. तेच रामदास कदम यांच्याविषयी करणार होते. कोणता पक्षप्रमुख आपल्याच पक्षातील नेत्यांला संपविण्यासाठी दुसऱ्या पक्षाची मदत घेऊ शकतो, असं शिंदे यांनी विचारलं.
बाळासाहेब कार्यकर्त्यांना पुढं नेणारे होते. पाठिशी उभे राहणारे होते. पण तुम्ही कार्यकर्त्यांना संपविण्याचा प्रयत्न करता. पण लक्षात ठेवा, कार्यकर्ता मोठा झाला, की पक्ष मोठा होतो. राज ठाकरे यांनी काय मागितलं होतं. त्यांना ते दिलं नाही. आता आम्ही एकमेकांना बोलतो. पूर्वी आम्हाला बंधने होती. आता बंधने नाहीत, असंही शिंदे म्हणाले.
दरम्यान रामदास कदम, गुलाबराव पाटलांच्या भाषणांना टाळ्या पडतात म्हणून उद्धव ठाकरेंनी त्यांची भाषणं बंद केली होती, असा गौप्यस्फोट शिंदे यांनी केला.