शिवसेनेवरून काँग्रेसमध्ये दुमत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 November 2019

...तर व्हीप काढावा लागेल
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र येऊन सरकार स्थापन करायचे असल्यास या तीनही पक्षांना तसा व्हीप जारी करावा लागणार आहे. विश्‍वासदर्शक ठरावावेळी सभागृहात सर्व सदस्य उपस्थित राहतील, याची काळजी या पक्षांना घ्यावी लागेल. असे झाल्यास सर्वाधिक जागा मिळविणारा भाजप विरोधी बाकांवर बसेल.

मुंबई/जयपूर - सरकार स्थापण्यात भाजपने असमर्थता दर्शविल्यानंतर शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेस पक्षात उभी फूट पडली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल हे सध्या जयपूरला जाऊन थांबलेल्या राज्यातील काँग्रेस आमदारांची भेट घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अहमद पटेल हे या आमदारांची मते जाणून घेऊन केंद्रातील वरिष्ठांना कळविणार आहेत.

भाजपने सत्ता स्थापणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यानंतर भाजपनंतरचा सर्वांत मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. ‘मुख्यमंत्री आमचाच’ असा घोष करणाऱ्या शिवसेनेकडे सरकार स्थापनेसाठी लागणारे बहुमत मात्र नाही.  सरकार स्थापण्यासाठी त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आवश्‍यक आहे. हा पाठिंबा द्यायचा की नाही, यावरून काँग्रेस नेत्यांमध्ये दुमत आहे. आम्हाला विरोधी बाकांवर बसण्याचा जनादेश मिळाला असल्याचे आघाडीच्या नेत्यांनी आधीच जाहीर केले असल्याने आता शिवसेनेला पाठिंबा देऊन सत्तेची संधी साधायची का, याबाबत चलबिचल असल्याचे समजते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena congress government politics