फक्त ‘विचारांचेच सोने’!

मुंबई - शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला गुरुवारी झालेली गर्दी. इन्सेटमध्ये मेळाव्यात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.
मुंबई - शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला गुरुवारी झालेली गर्दी. इन्सेटमध्ये मेळाव्यात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.

मुंबई - शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा हा ‘ऐतिहासिक’ ठरणार, त्यात ‘महत्त्वपूर्ण घोषणा’ होणार, अशा अपेक्षा शिवाजी पार्कवर घोंघावत असलेल्या वाऱ्यात उडवून लावत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी आपल्या तडफदार भाषणात नेहमीप्रमाणे ‘विचारांचेच सोने’ लुटले. 

शिवसैनिकांच्या, त्यातही युवा सैनिकांच्या प्रचंड गर्दीत पार पडलेल्या या सभेत ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर कडाडून टीका करतानाच शिवसेना यापुढे राम मंदिराचा मुद्दा ठोसपणे हाती घेणार असल्याचे जाहीर केले. राम मंदिर हाही भाजपचा निवडणुकीसाठीचा जुमला तर नाही ना, असा तिखट सवाल करीत त्यांनी २५ नोव्हेंबरला ‘चलो अयोध्या’ असा नारा या वेळी दिला.

दर वर्षी ‘रावण’ उभा राहतो; परंतु राम मंदिर उभे राहत नाही, अशी खंत आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच व्यक्त करीत उद्धव यांनी हिंदुत्व आणि राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. देशात हिंदुत्वाची हवा सुरू असताना अयोध्येत राम मंदिर का उभे राहत नाही? चार वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदाही अयोध्येत का गेले नाहीत? असे सवाल करीत भाजपला राम मंदिर उभारण्याची आठवण करून देण्याकरिता आपण अयोध्येत जाणार असल्याचे ते म्हणाले. हिंदुत्वाच्या भरोशावरच शिवसेना युतीत आहे. शिवसेना सत्तेत आहे, यावरून टीका सहन करतोय; पण राम मंदिराच्या उभारणीसाठीच सत्तेत आहोत. याचे भान ठेवा, असेही ठाकरे यांनी सुनावले. 

मोदी हेही दिल्लीत रावण दहनाला गेले असतील; पण छाती किती इंचाची ते महत्त्वाचे नाही. धनुष्य पकडण्यासाठी मनगटात ताकद असायला हवी. त्याच ताकदीवर महागाई कमी करण्याची धमक का दाखवत नाहीत, 
असा सवालही ठाकरे यांनी मोदींना केला. या संपूर्ण भाषणात ठाकरे यांनी मोदी आणि शहा यांच्यावर कधी नाव घेत, कधी व्याजोक्ती, वक्रोक्ती अशा अलंकारांचा आधार घेत जोरदार टीका केली. देशाच्या पत्रिकेत सध्या वक्री झालेले शनि आणि मंगळ आहेत; पण या वक्री ग्रहांना सरळ करण्याची ताकद शिवसैनिकांत आहे. आता २०१४ सालची हवा राहिलेली नाही. त्या हवेतही शिवसैनिकांनी टक्कर देत स्वबळावर ६३ आमदार विजयी केले होते, याचे भान ठेवा, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

३७० रद्द कराचं
काश्‍मीरसाठी असलेले ३७० कलमावरून देशातल्या हिंदूंच्या भावनांशी भाजप खेळली. आता सत्तेत आहात तर ३७० कलम काढून टाकण्याची हिंमत का दाखवत नाहीत, तेवढी तरी हिंमत आहे काय, असा सवाल करत ३७० कलम रद्द करण्यासाठी लोकसभेत ठराव आणा, शिवसेना खांद्याला खांदा लावून उभी राहील, असा विश्‍वास ठाकरे यांनी या वेळी दिला.

संजय राऊत म्हणाले, ‘‘पुढच्या सहा महिन्यांत मंत्रालयात साचलेला कचराही वाहून जाईल. आता आपली वेळ सुरू झाली आहे. आमचा स्वबळाचाच कारभार सुरू आहे. २०१९ ला शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल.’’ शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले, ‘‘शिवसेनेचा एक विक्रम आहे. गेली पन्नास वर्षे एक मैदान, एक नेता, एक पक्ष आणि दसरा मेळावा. ही परंपरा सुरू आहे.’’ 

दुष्काळ जाहीर करा
दुष्काळाचा राक्षस सध्या महाराष्ट्रात उभा आहे. मराठवाडा तर दुष्काळाने होरपळतोय. कर्नाटक सरकारने जुने निकष घेऊन दुष्काळ जाहीर केला; पण आमचे मुख्यमंत्री अभ्यास करताहेत. लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करा; अन्यथा शिवसेना सरकारविरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशाराही ठाकरे यांनी या वेळी दिला.

दसरा मेळाव्यात...
 राम मंदिराच्या मुद्द्यावर भर
 २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाण्याची घोषणा
 महागाई, दुष्काळाच्या प्रश्‍नावरून सरकारला तडाखे

क्षणचित्रे 
 महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर, नेते सुभाष देसाई, संजय राऊत आणि रामदास कदम यांचीच भाषणे झाली.
 माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी पाच मिनिटे बोलू द्या, असे म्हणत असल्याचा आवाज ऐकू येत होता. 
 उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच राम मंदिराचा मुद्दा भाषणात आणला.
 शिवसेनेच्या विभागप्रमुखांच्या वतीने उद्धव यांना प्रभू रामचंद्रांची मूर्ती भेट देण्यात आली.
 उद्धव यांचे भाषण सुरू असताना मागे बसलेल्या शिवसैनिकांना भाषण ऐकू येत नसल्याचे वारंवार सांगितले जात होते. 
 पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी घाईघाईत आपला कार्यअहवाल प्रकाशित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com