'मुख्यमंत्री भाजपचा'मुळे शिवसेनेत अस्वस्थता 

Shiv Sena, BJP
Shiv Sena, BJP

मुंबई : भाजपच्या दिल्लीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे वक्‍तव्य केल्याने शिवसेनेत अस्वस्थता वाढली आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात चर्चा झाल्यानंतरच मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार असल्याचे शिवसेनेचे नेते सांगत आहेत. 

दिल्लीत काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाबाबतच्या शहांच्या वक्तव्यावरून शिवसेनेत नाराजी पसरली आहे. याआधी चंद्रकांत पाटलांनी युतीच्या 153/135 च्या फॉर्म्युल्यावर केलेल्या वक्तव्यानेही शिवसेनेत नाराजी होती. भाजपच्या कोअर कमिटीची काल दिल्लीत बैठक झाली. राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीवर या वेळी मंथन करण्यात आले. "विधानसभेसाठी शिवसेनेसोबत युती राहणार आहे. मात्र, महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचाच हवा,' असे वक्तव्य शहांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तसेच आशिष शेलार, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, सुभाष देशमुख आदी नेते या बैठकीला उपस्थित होते. 

विधानसभेसाठी राज्यात शिवसेनेसोबत युती ही होणारच आहे. लोकसभेला नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनविण्यासाठी काम केले. तसेच, विधानसभेला भाजपचा मुख्यमंत्री बनण्यासाठी काम करायचे आहे. केवळ आपल्याच जागांवर नव्हे, तर मित्रपक्षाच्याही जागा निवडून आणण्यासाठी तितकीच मेहनत करा, अशा सूचना अमित शहांनी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, सुधीर मुनगंटीवार यांनीही असेच विधान केल्याने शिवसेनेत नाराजी पसरल्याचे सांगण्यात आले. 

केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला दिलेल्या "अवजड' मंत्रिपदावरूनही शिवसेनेत नाराजी आहे. मात्र, उद्धव ठाकरेंनी खंडन केले आहे. सोबतच शिवसेनेने लोकसभा उपाध्यक्षपद शिवसेनेला देण्याची मागणीही केली होती. चंद्रकांत पाटील यांनी युतीच्या जागावाटप फॉर्म्युल्यावर केलेल्या वक्तव्यावरूनही शिवसेना नाराज होती. आता अमित शहांच्या कोअर कमिटीतील कानमंत्रामुळे त्यात भरच पडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com