...तरीही शिवसेना स्वबळावरच लढणार: संजय राऊत

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 जून 2018

अमित शहा यांचा अजेंडा काय आहे, हे आम्हाला माहिती आहे. पण, आम्ही यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याचा ठराव मंजूर केलेला आहे. त्यामुळे यापुढे सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढणार आहे. या ठरावामध्ये कोणताही बदल होणार नाही.

मुंबई: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन 24 तास होत नाही तोपर्यंतच शिवसेनेने आपली भूमिका कायम ठेवताना शिवसेना यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

एएनआयशी बोलताना संजय राऊत म्हणाले, की अमित शहा यांचा अजेंडा काय आहे, हे आम्हाला माहिती आहे. पण, आम्ही यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याचा ठराव मंजूर केलेला आहे. त्यामुळे यापुढे सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढणार आहे. या ठरावामध्ये कोणताही बदल होणार नाही. एखाद्या पक्षाचा ठराव हा दुसऱ्या पक्षाच्या ठरावावर अवलंबून असू शकत नाही. 

शिवसेनेने आगामी निवडणुकीसाठी भाजपसोबत यावे, नाराजीचे मुद्दे सोडवता येतील, असे सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 'समर्थना'साठी शिवसेनेशी संपर्क केला. शहा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात 'मातोश्री'वर सुमारे सव्वा तास बंद दाराआड चर्चा झाली. तीन वर्षांतील काही उदाहरणे देत उद्धव यांनी काही विषयांवर नाराजी व्यक्त केल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही या चर्चेत भाग घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, या चर्चेतून शिवसेनेची मनधरणी करण्यात भाजप अपयशी ठरल्याचे दिसत आहे. शिवसेनेने स्वबळाचा नारा पुन्हा एकदा देत ही बैठक निष्फळ ठरल्याचे समोर आणून दिले आहे.

Web Title: ShivSena has passed a resolution that we will contest all elections on our own says Sanjay Raut