शिवसेनेकडून मंत्री म्हणून कुणाची वर्णी; देसाई, सावंत, राऊत यांची चर्चा 

Shivsena
Shivsena

मुंबई : अनंत गिते, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, शिवाजीराव-आढळराव पाटील ही लोकसभेतील शिवसेनेची पहिली फळी निवडणुकीत पराभूत झाल्याने केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेकडून मंत्री म्हणून कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे. सध्या शिवसेनेत केंद्रीय मंत्रिपदासाठी राज्यसभा सदस्य अनिल देसाईंसह संजय राऊत, अरविंद सावंत यांच्या नावाची चर्चा आहे. 

सतराव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपसोबत युती केली होती. युतीत २३ जागा लढविणाऱ्या शिवसेनेला १८ जागा मिळाल्या. २०१४ च्या निवडणुकीतील खासदारांची संख्या राखण्यात शिवसेनेला यश आले असले तरी रायगड, अमरावती, औरंगाबाद आणि शिरूर या बालेकिल्ल्यात सेनेला पराभव पत्कारावा लागला. या चार ठिकाणी पराभूत झालेले उमेदवार मंत्रिपदाचे दावेदार होते. त्यापैकी अनंत गिते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मावळत्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. गिते यांनी पाच वर्षे अवजड उद्योग खात्याची जबाबदारी सांभाळली होती. 

या पार्श्वभूमीवर शिवसेना केंद्रीय मंत्रिमंडळ कुणाला संधी देणार याची उत्सुकता शिवसैनिकांना लागली आहे. शिवसेनेकडून सध्या अनिल देसाई यांचे नाव आघाडीवर आहे. देसाई शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे जवळचे मानले जातात. शिवसेनेचे सचिव म्हणूनही देसाई कार्यरत आहेत. चार वर्षापूर्वी मोदींनी जेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला त्या वेळी शिवसेनेकडून देसाई यांचे नाव देण्यात आले होते. मात्र शेवटच्या क्षणी मंत्रिपदाची शपथ घेण्याऐवजी देसाईंना माघारी बोलविण्यात आले. त्यामुळे मंत्रिपदासाठी देसाईंची दावेदारी मानली जाते. 

याशिवाय नवी दिल्लीत शिवसेनेची भूमिका मांडणारे खासदार संजय राऊत यांचेही नाव संभाव्य मंत्री म्हणून घेतले जात आहे. लोकसभा निवडणुकीत मुंबई आणि कोकण विभाग शिवसेनेच्या पाठीशी राहिला. त्यामुळे दक्षिण मुंबईतून निवडून आलेले अरविंद सावंत, रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून विजयी झालेले विनायक राऊत यांचेही नाव संभाव्य मंत्री म्हणून घेतले जात आहे. सावंत आणि राऊत हे दोघेही दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून आले आहेत. यापैकी सावंत यांचे हिंदी, इंग्रजीवर प्रभुत्व आहे. अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून सावंत यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेचा प्रतिनिधी पाठवताना उद्धव ठाकरे अन्य नावाचा विचार करून शिवसैनिकांना धक्का देऊ शकतात, अशीही चर्चा आहे. 

गडकरी, जावडेकर कायम राहणार? 
महाराष्ट्रातून भाजपचे २३ खासदार निवडून गेले आहेत. त्यामुळे यंदाही केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राला चांगले स्थान मिळेल, अशी आशा आहे. भाजपकडून नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांना पुन्हा संधी दिली जाईल अशी चिन्हे आहेत. याशिवाय रावसाहेब दानवे, पूनम महाजन, विनय सहस्रबुद्धे यांचीही नावे चर्चेत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com