औरंगाबाद : शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी बाण खाली ठेवत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले.
खोतकर म्हणाले, की शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा निर्णय माझ्यासाठी अंतिम आहे. आता युतीच्या कामासाठी लागायचे आहे. त्यामुळे मी आता युतीसाठी काम करणार आहे. मी दगाफटका करणार नाही.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जालन्याची जागा भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रतिष्ठेची बनली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची उमेदवारी जाहीर करण्याच्या आड शिवसेनेचे जालन्यातील नेते अर्जुन खोतकर शड्डू ठोकून उभे होते. जालना लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे घ्यावी अन्यथा रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मैत्रीपूर्ण लढतीचे आव्हान देत अजूनही निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली नसल्याचे खोतकर यांनी स्पष्ट करीत दानवे यांच्यावर टांगती तलवार कायम होती. पण, आता खोतकरांनी माघार घेतल्याने युतीमध्ये दिलजमाई झाल्याचे दिसून आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत आज औरंगाबादला अर्जुन खोतकर यांची पुन्हा एकदा बैठक झाली. त्यानंतरच खोतकरांनी माघार घेत असल्याचे जाहीर केले. जालन्यात भाजप आणि शिवसेनेत स्थानिक राजकारण तीव्र टोकाला गेले असल्याने जालन्यामध्ये शिवसेना टिकवण्यासाठी जालन्याची जागा शिवसेनेलाच मिळावी, असा आग्रह अर्जुन खोतकर यांनी लावून धरला होता. पण, आता खोतकर दानवेंचा प्रचार करताना दिसणार आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.