
Naresh Mhaske: 'अजितदादांचे पुतळे जाळा' असे सांगणे ही गद्दारी की खुद्दारी?
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठेही गेले की सहा महिन्यांपूर्वी आम्ही असेच केले होते अशी शेखी मिरवतात," अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नुकतीच केली होती. या टीकेला शिवसेनेचे नेते, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते ठाण्यात माध्यमांशी बोलत होते.
जितेंद्र आव्हाडांनी एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्कल करुन त्याच्यावर टीका केली होती. "मुख्यमंत्री कुठे ही गेले की सहा महिन्यांपूर्वी आम्ही असेच केलं होतं, अशी शेखी मिरवतात. क्रिकेटच्या कार्यक्रमात गेले की म्हणतात, सहा महिन्यांपूर्वी आम्हीही असेच फटकारे मारले होते. कबड्डीच्या कार्यक्रमाला गेले की म्हणतात, सहा महिन्यांपूर्वी आम्हीही असेच पाय खेचले होते, खो-खोच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले की मुख्यमंत्री म्हणतात, सहा महिन्यांपूर्वी आम्हीही असेच खो दिला होता, असं आव्हाड म्हणाले होते.
"सहा महिन्यांपूर्वी तुम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला होता," ही जहरी टीका आव्हाडांनी शिंदेवर केली होती. ही टीका शिवसेना शिंदे गटाच्या जिव्हारी लागली आहे. आव्हाडांच्या या विधानावर नरेश म्हस्के यांनी पलटवार केल्याचं दिसुन आलं आहे.
"देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी केला होता. तेव्हा ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, कार्यकर्ते यांना घेऊन जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांच्या प्रतिमेला काळं फासलं होतं. त्यांचा पुतळा जाळला होता. त्यावेळी त्यांनी (जितेंद्र आव्हाड) मलाही फोन करुन अजित पवारांचे पुतळे जाळा, त्यांच्या प्रतिमेला काळे फासा असं सांगितलं होतं. आव्हाडांची ही गद्दारी आहे की खुद्दारी, असा प्रश्न नरेश म्हस्कें यांनी उपस्थित केला आहे.