विधानपरिषदेच्या उपसभापतिपदी निलम गोऱ्हे बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

विधिमंडळाच्या नियम सहा आणि सातनुसार उपसभापतीपदासाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम एक दिवस आधी जाहीर करणं अपेक्षित होते. मात्र ही तरदूत स्थगित करण्यासंबंधी विधानकार्य मंत्री विनोद तावडे यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव सभागृहानं मंजूर केला. त्यानंतर सभापतींनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या विधानपरिषदेच्या उपसभापतिपदी शिवसेना नेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. 

आज (सोमवाऱ) संध्याकाळी चार वाजता ही अधिकृत घोषणा झाली. आज सभागृहाचं कामकाज सुरू होताच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. विधानपरिषद उपसभापतिसाठी निलम गोऱ्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विरोधकांना विश्वासात घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

विधिमंडळाच्या नियम सहा आणि सातनुसार उपसभापतीपदासाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम एक दिवस आधी जाहीर करणं अपेक्षित होते. मात्र ही तरदूत स्थगित करण्यासंबंधी विधानकार्य मंत्री विनोद तावडे यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव सभागृहानं मंजूर केला. त्यानंतर सभापतींनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.

काँग्रेस गटनेते शरद रणपिसे आणि काँग्रेस सदस्य जनार्दन चांदूरकर यांनी आदल्या दिवशी निवडणूक कार्यक्रम जाहीर न करता आज निवडणूक घ्यायला हरकत घेतली, मात्र सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यापूर्वी २४ जुलै १९९८ आणि १३ सप्टेंबर २००४ असे दोनदा एका दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याचा दाखला दिला आणि काँग्रेसची हरकत फेटाळून लावत स्वतःचे अधिकार वापरून निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याचे घोषित केले होते.

युतीकडून शिवसेनेच्या निलम गोऱ्हे यांचं नाव या पदासाठी निश्चित करण्यात आले होते.ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता होती आणि तसेच झाले. विधानपरिषदेतलं संख्याबळ लक्षात घेता युतीचं पारडे जड आहे .मात्र उपसभापतीपदाची जर काँग्रेस आघाडीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर अपक्षांचा विचार करता ही निवडणूक अटीतटीची झाली असती. पण, विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड झाल्यानंतर गोऱ्हे यांच्या नावाची औपचारिक घोषणा बाकी होती. माणिकराव ठाकरे यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्यानंतर २० जुलै २०१८ पासून उपसभापतिपद रिक्त होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena leader Neelam Gorhe files application for deputy president post in assembly