मला प्रश्‍न विचारणारा तू कोण?- मंत्री रामदास कदम

ब्रह्मदेव चट्टे
गुरुवार, 16 मार्च 2017

विधिमंडळ अधिवेशनात, प्रसारमाध्यमांकडे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांविषयी कळकळीने बोलणाऱ्या नेत्यांसाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा केवळ "ब्लेम गेम' आहे की काय, अशी शंका येते.

मुंबई - शेतकऱ्याची पहिली आत्महत्या नेमकी कधी झाली आणि त्यासाठी आंदोलन होतेय हे तुम्हाला माहीत आहे काय? त्या अन्नत्याग आंदोलनात तुम्हीही सहभागी होणार का? असे साधे प्रश्न विचारल्यानंतर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाबाबत विरोधी पक्षनेता असताना मी केलेली भाषणे वाच, मग तुला कळेल. तू कोण मला प्रश्‍न विचारणारा?, असे उत्तर दिले. त्यामुळे विधिमंडळ अधिवेशनात, प्रसारमाध्यमांकडे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांविषयी कळकळीने बोलणाऱ्या नेत्यांसाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा केवळ "ब्लेम गेम' आहे की काय, अशी शंका येते.

सकाळचे पत्रकार ब्रह्मदेव चट्टे यांनी रामदास कदम यांना दूरध्वनीवरून प्रतिक्रियेसाठी संपर्क केला असता ते म्हणाले, "सकाळ'ला दोन वेळा बातम्या आल्या की, एकनाथ शिंदे यांचे सोडून सगळ्या मंत्र्यांचे राजीनामे घ्या. अशी आमदारांची मागणी होती? कोणत्या आमदाराची मागणी होती ही, ते सांगा आधी, तोपर्यंत मी तुमच्यासोबत बोलणार नाही. तुम्ही मला प्रश्‍न विचारणारे कोण? तुम्हाला प्रश्‍न विचारण्याचा अधिकार कोणी दिला? शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाबाबत विरोधी पक्षनेता असताना मी केलेली भाषणे वाच, मग तुला कळेल. तू कोण मला प्रश्‍न विचारणारा?

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत राजकीय नेत्यांना असलेली याबाबतची माहिती आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याकरता त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी विधिमंडळात झगडणाऱ्या नेत्यांना आम्ही विचारले, "शेतकऱ्याची पहिली आत्महत्या नेमकी कधी झाली आणि त्यासाठी आंदोलन होतेय हे तुम्हाला माहीत आहे काय? त्या अन्नत्याग आंदोलनात तुम्हीही सहभागी होणार का?'
आम्हाला मिळालेली उत्तरे अशी-

मला या आंदोलनाची तारीख सांगता येणार नाही. आंदोलनाबाबत माझ्या वाचनात आलेले नाही. मला याची काही कल्पना नाही, पण मी मुंबईत असेन तर या आंदोलनामध्ये नक्कीच सहभागी होण्याचा प्रयत्न करेन.
- आमदार नारायण राणे, माजी मुख्यमंत्री

मला शेतकऱ्याची पहिली आत्महत्या कधी झाली माहीत नाही. बहुतेक 2002 पासून या आत्महत्या सुरू झाल्या असाव्यात. मला अन्नत्याग आंदोलनाची काही कल्पना नाही. मी याबाबत माहिती घेऊन सहभागी व्हायचे की नाही, हे ठरवतो.
- पांडुरंग फुंडकर, कृषिमंत्री

मला अचूक तारीख व ठिकाण माहीत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर सारखीच आंदोलने होत असतात. राज्यात आंदोलन होत आहे, असे ऐकत असतो. 19 तारखेला होणाऱ्या उपोषणाबाबत मला माहीत नाही. उपोषणात सहभागी व्हायलाच हवे, असे मला वाटते.
- सुभाष देशमुख, सहकार, पणनमंत्री

किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी पुकारलेल्या आंदोलनात मी सहभागी होणार आहे.
- कपिल पाटील, आमदार

अमर हबीब यांच्या राज्यव्यापी आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. या उपोषण आंदोलनात जरी थेट सहभागी होता नाही आले तरी, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर होणाऱ्या आंदोलनात आम्ही आहोतच.
- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

अमर हबीब यांच्या संघटनेचे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर उपोषण आंदोलन 19 मार्चला आहे, हे आपल्याकडून समजले. या आंदोलनात कॉंग्रेस पक्ष म्हणून सहभागी व्हायचे की नाही, याबाबत उद्या समन्वय समितीच्या बैठकीत विषय मांडता येईल; परंतु केवळ शेतकऱ्यांच्या समस्येसाठी पक्षविरहित आंदोलन करण्याचा हबीब यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. या आंदोलनाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे.
- शरद रणपिसे, कॉंग्रेस गटनेते, विधान परिषद

मला पहिली शेतकऱ्याची आत्महत्या कधी व कुठे झाली माहीत नाही. गेल्या अनेक वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. याबाबत कोणी उपोषण करते आहे, याची कल्पना नाही. आत्महत्येवर उपाययोजना करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांचा समावेश अन्नसुरक्षा कायद्यात करायला हवा.
- रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री, बंदर विकास व अन्न औषध प्रशासन

राज्यात शेतकऱ्याची पहिली आत्महत्या 19 मार्च 1986 किंवा 87 च्या दरम्यान झाल्या कारणाने 19 मार्चला उपोषण करण्याचे ठरविण्यात आले असावे. या आंदोलनाविषयी अमरकाकांशी माझे बोलणे झाले आहे. शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने मी स्वतः 19 मार्चला दिवसभर उपवास करणार आहे. कर्जमाफी हा दुर्मिळातील दुर्मिळ उपाय आहे. मुळात या विषयावर राजकारण न करता सर्व पक्षांनी एकत्र येऊन शेतकऱ्याला जाचक ठरणारे कायदे रद्द करायला हवेत.
- सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री

Web Title: Shivsena Leader Ramdas Kadam Misbehaves With Sakal reporter over Farmer Suicide question

व्हिडीओ गॅलरी