आक्रमक शिवसैनिक, राज्यमंत्री ते कॅबिनेट मंत्री; संजय राठोड यांचा प्रवास 

चेतन देशमुख
Monday, 30 December 2019

2014च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वसंत घुईखेडकर यांचा पराभव करून राठोड यांनी हॅटट्रिक साधली. गेल्या 2019मध्ये माजी राज्यमंत्री संजय देशमुख आव्हान उभे करतील, अशी चर्चा होती. मात्र, या निवडणुकीतही राठोड यांनी तब्बल 60 हजारांवर मते घेऊन सलग चौथ्यांदा विधानसभेत प्रवेश केला. सतत मतदारांच्या संपर्कात असणारा नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे. 

यवतमाळ : बी. कॉम., एम. पीएड. अशा पदवी घेतलेला एक तरुण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राजकारणात आला. कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेला जिल्हा त्यातही कॉंग्रेसचा गड म्हणून ओळख असलेल्या त्या काळातील दारव्हा मतदारसंघातून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. एक शिवसैनिक ते कॅबिनेट मंत्री असा अफलातून राजकीय प्रवास आमदार संजय राठोड यांचा राहिला आहे. 

महसूल राज्यमंत्री तथा कॅबिनेट मंत्री असलेले संजय राठोड मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्‍यातील पहूर (शिवपुरी) येथील रहिवासी. मात्र, त्यांची राजकीय कारकीर्द दारव्हा, दिग्रस व नेर या तालुक्‍यांतच शिवसेनेचा तडफदार कार्यकर्ता म्हणून विस्तारत राहिली आहे. 1990 ते 2000 या काळात यवतमाळ जिल्हा कॉंग्रेसमय होता. ग्रामपंचायत ते लोकसभेत कॉंग्रेसचीच सत्ता होती. या कठीण काळात संजय राठोड यांनी शिवसेनेची बांधणी सुरू केली. 1997मध्ये वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी शिवसेना जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यांवर आली. या संधीचे संजय राठोड यांनी सोने केले. 

Image may contain: 1 person, closeup

यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेची बांधणी तर केलीच शिवाय दारव्हा विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांना आव्हान उभे केले. 2004च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन गृहराज्य मंत्री माणिकराव ठाकरे यांचा पराभव करून कॉंग्रेसच्या गडावर भगवा फडकविला. 2009मध्ये विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यात दारव्हा विधानसभा मतदारसंघ बाद झाला. पुनर्रचनेनंतर दिग्रस मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघातूनही संजय राठोड यांनी कॉंग्रेसचे तत्कालीन क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांचा पराभव केला. या निवडणुकीत त्यांचे संघटन कौशल्य दिसून आले. राज्यात सर्वाधिक मतांनी विजयी होणाऱ्या पहिल्या पाच आमदारांमध्ये त्यांचे नाव होते. 

मतदारांच्या संपर्कात असणारा नेता

2014च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वसंत घुईखेडकर यांचा पराभव करून राठोड यांनी हॅटट्रिक साधली. गेल्या 2019मध्ये माजी राज्यमंत्री संजय देशमुख आव्हान उभे करतील, अशी चर्चा होती. मात्र, या निवडणुकीतही राठोड यांनी तब्बल 60 हजारांवर मते घेऊन सलग चौथ्यांदा विधानसभेत प्रवेश केला. सतत मतदारांच्या संपर्कात असणारा नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे. 

Image may contain: 1 person, smiling, closeup

कामाचा आलेख वाढताच राहिला

भाजप-शिवसेना सरकारच्या काळात महसूल राज्यमंत्री असतानाही मतदारसंघात वेळ देऊन लोकांची कामे त्यांनी केली. याचा परिणाम नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिसून तर आलाच. मात्र, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुकीतही याची प्रचिती आली आहे. दारव्हा, दिग्रस व नेर या तीनही तालुक्‍यांत विरोधकांना एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून आणता आलेला नाही. दिग्रस मतदारसंघात शिवसेनेची एकहाती सत्ता कायम आहे. गेली 20 वर्षे शिवसेना जिल्हाप्रमुख व 15 वर्षांपासून शिवसेना आमदार म्हणून शिवसेना नेते संजय राठोड यांचा कामाचा आलेख वाढताच राहिला आहे. 

Image may contain: 1 person, standing and closeup

एक वर्ष जिल्ह्याचे पालकमंत्री

युतीच्या काळात सुरुवातीला एक वर्ष जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी होती. या काळात सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय सेवेचे भक्कम काम त्यांनी केले. त्यानंतर राठोड यांना वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री, तर यवतमाळ जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. या काळात त्यांनी मंत्री म्हणून आपली छाप सोडली आहे. गेल्या 1999 ते 2000 या काळात एक आक्रमक शिवसैनिक म्हणून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास आता थेट कॅबिनेटमंत्री पदापर्यंत पोहोचला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena leader sanjay rathod sworn in as cabinet minister of maharashtra