
Sanjay Raut : श्रीकांत शिंदेंनी मला मारण्याची सुपारी दिलीये; राऊतांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
खासदार संजय राऊत यांनी ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात संजय राऊत यांनी खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांना लिहिलेल्या पत्रात संजय राऊत म्हणतात, "गेली ४० वर्षे मी सार्वजनिक जीवनात आहे. राजकारणासोबत पत्रकारिता करत आहे. मला अनेकदा ठार मारण्याच्या धमक्या येत असतात आणि तसे प्रयत्नही झाले. मी आज आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, माझ्यावर हल्ला करण्याचा कट ठाण्यात शिजल्याची माहिती अत्यंत विश्वसनीयरित्या समजली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एक गुंड राजा ठाकू व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली असून मला समजलेली ही माहिती अत्यंत जबाबदारीने आपल्या निदर्शनास आणत आहे."
तर हाच आरोप करत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहिलं आहे. आपल्या पत्रात राऊत म्हणतात, "गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे व हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली. माझी त्याबद्दल तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होत असतात. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे व गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात, तरीही एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे".
या आरोपानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी 'सकाळ डिजिटल'ने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही.