
Sanjay Raut : श्रीकांत शिंदेंनी जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपानंतर राऊतांच्या सुरक्षेत वाढ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप काल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. याबाबत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्राची दखल घेण्यात आली आहे.
श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी काल केला. याबद्दल त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली. ती मागणी आता मान्य करण्यात आली आहे. संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
आता संजय राऊतांच्या सुरक्षेसाठी तीन पोलीस आणि गा़ड्यांच्या ताफ्यात एक वाहन तैनात असणार आहे. काल संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. गुंड राजा ठाकूर याला आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या आरोपांबद्दल अद्याप मुख्यमंत्री शिंदे किंवा श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केलेलं नाही.