अस्वस्थ शिवसैनिकांची कहाणी!

प्रकाश अकोलकर
Tuesday, 6 August 2019

गेल्या काही वर्षांपासून युतीचा पुकारा करत भारतीय जनता पक्षामागे शिवसेनेची सुरू असलेली फरपट सामान्य शिवसैनिकाच्या जिव्हारी लागत आहे. भाजपची मेगाभरती, मोदी लाट, विधानसभेला स्वतंत्र लढणे आणि आता लोकसभेवेळी पुन्हा युती करणे, मध्येच सरकारविरोधात उठवलेले आवाज, अशा अनेक घटनांनी शिवसैनिक पुढे काय, असा प्रश्‍न विचारत आहे. या वेळी जागावाटपात काय वाट्याला येणार आणि काय गमावणार, याचं गणित त्याला सतावत आहे.

गेल्या काही वर्षांपासून युतीचा पुकारा करत भारतीय जनता पक्षामागे शिवसेनेची सुरू असलेली फरपट सामान्य शिवसैनिकाच्या जिव्हारी लागत आहे. भाजपची मेगाभरती, मोदी लाट, विधानसभेला स्वतंत्र लढणे आणि आता लोकसभेवेळी पुन्हा युती करणे, मध्येच सरकारविरोधात उठवलेले आवाज, अशा अनेक घटनांनी शिवसैनिक पुढे काय, असा प्रश्‍न विचारत आहे. या वेळी जागावाटपात काय वाट्याला येणार आणि काय गमावणार, याचं गणित त्याला सतावत आहे.

शिवसैनिक हे खरं तर कधीही अस्वस्थ होत नाहीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या मनात रुजवलेला लढाऊ बाणा आज हरवल्यासारखा दिसत आहे. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकांनंतर भारतीय जनता पक्षाबरोबर २५ वर्षे कायम असलेली युती तुटली आणि हा शिवसैनिक संतापून उठला. त्याने उद्धव ठाकरे यांना ६३ जागा जिंकून दिल्या. मात्र, तोच शिवसैनिक आज अस्वस्थ आहे; कारण त्यानंतर पक्षात काय चाललं आहे, तेच त्याला कळेनासं झालं आहे. विधानसभेत मानाचं विरोधी पक्षनेतेपद मिळालेलं असतानाही, उद्धव ठाकरे यांनी पक्षांतर्गत दबावाखाली सरकारात सामील होऊन आश्रिताचं जिणं स्वीकारलं, तेव्हापासूनच तो अस्वस्थ आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तडफेने सरकारवर तोफा डागल्या आणि स्वतंत्रपणे लढण्याची भाषा केली, तेव्हा त्या शिवसैनिकाच्या मनात तो पूर्वीचा लढाऊ बाणा पुन्हा एकदा जागा झाला होता. मात्र, उद्धव यांनी सारे मानापमान निमूट गिळून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा युती केली, तरीही तोच अस्वस्थ शिवसैनिक तडफेनं लढला होता. 

मात्र, आता भाजपमध्ये सुरू असलेली ‘मेगाभरती’ बघून तर तो कमालीचा अस्वस्थ झाला आहे, हे निश्‍चित. 

त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने विधानसभा युतीच लढवणार, अशी भाषा करत असले तरी या मेगाभरतीपुढे आता आपला पाड लागणार नाही, याची या शिवसैनिकाला जाणीव होऊ लागली आहे.

भाजपमध्ये आतापावेतो दाखल झालेल्या काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आमदारांपैकी किमान पाच जागा या युतीच्या जागावाटपातील शिवसेनेच्या आहेत. त्या अर्थातच भाजपला हव्या असणार. शिवाय, ऑगस्ट महिन्यांत आणखी मेगाभरतीचे वायदे भाजप करत आहे. त्यामुळे युती झालीच तर आपल्या वाट्याला काय येणार, या चिंतेनं त्याला ग्रासलं आहे.

केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल मनात असलेल्या श्रद्धेपोटी आज तो ही मनातली खदखद मनातच ठेवून नेतृत्वाच्या मागे फरपटत जात आहे. 

ही भावना जशी गावोगावच्या शिवसैनिकांच्या मनात आहे, त्याचबरोबर ‘मातोश्री’वर मुक्‍त प्रवेश असलेले चार-सहा नेते वगळता अन्य दुसऱ्या फळीच्या नेत्यांच्या मनातदेखील आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांच्या नावाने अगदी मोजकेच नेते करत असलेला मुख्यमंत्रिपदाचा गजर बघून तर हे नेतेही कमालीचे अचंबित झाले आहेत. सरकारात सामील होण्याचा निर्णय झाल्यावरही थेट निवडून आलेल्या विधानसभेतील ६३ आमदारांपैकी फक्‍त एकनाथ शिंदे या आमदारालाच मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे हे नेतेही आला दिवस साजरा करत ‘दिन भरो आंदोलना’त गुंतून पडले आहेत; तर अस्वस्थ शिवसैनिक आपल्या भवितव्याची चिंता करत आहेत. शिवसेनेच्या गोटात सध्या तरी हे असंच कमालीच्या अस्वस्थतेचं वातावरण आहे.

आम्ही नवमतदार 
मतदानाचा हक्क प्रत्येक तरुणाने बजावला पाहिजे. एका मतामुळे उमेदवार विजयी अथवा पराजित होत असतो. नवमतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क सजगपणे बजावणे गरजेचे आहे. इतरांनाही मतदानासाठी प्रवृत्त करावे. लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान करणे आवश्‍यक आहे. 
- राजश्री अाल्हाट, नगर 

पहिल्यांदाच मतदान करणार आहे. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी स्वार्थी राजकारण बाजूला ठेवून जनतेच्या समस्या सोडविण्यावर भर दिला पाहिजे. विकासाला प्राधान्य देत ग्रामीण भागातील बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. 
- संकल्प गजघाटे, अकोट फैल, अकोला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena Politics Aaditya Thackeray