आता परतीचे दोर कापा

- मृणालिनी नानिवडेकर
गुरुवार, 2 मार्च 2017

शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांचे उद्धव ठाकरे यांना आवाहन

शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांचे उद्धव ठाकरे यांना आवाहन
मुंबई - 'भारतीय जनता पक्ष हा आपल्या मुळावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांच्याशी हातमिळवणी करणे म्हणजे खुनास निमंत्रण देणे आहे आणि त्यांच्यासमवेत राहाणे म्हणजे "स्लो पॉयझनिंग' आहे,'' अशा तीव्र शब्दांत शिवसेनेतील काही प्रमुख नेत्यांनी भावना व्यक्‍त केल्या आहेत. "युती नकोच' या विधानावर कायम राहा अशी आर्जवे दररोज मातोश्रीवर भेटीसाठी दाखल होणारे शिवसैनिक करत असून, संपूर्ण राज्यात निवडून आलेल्या प्रत्येकाची मते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: ऐकत आहेत.

मुंबईचे महापौरपद आणि त्यानिमित्ताने उभ्या राहणाऱ्या संघर्षाबाबत आज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि लीलाधर डाके यांच्याशी बंद दरवाजाआड दोन तास चर्चा केली. भाजपप्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा आमदारपुत्र संतोष याच्या विवाहसमारंभाला जाणे टाळण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेणे उचित ठरेल, असा सल्लाही त्यांना काही ज्येष्ठ नेत्यांनी दिल्याचे समजते.

दरम्यान, भाजपने "विवाहनिमंत्रण डिप्लोमसी' कायम ठेवली असून, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुलीच्या लग्नाचे आवतण देण्यासाठी मातोश्री गाठली. या भेटीदरम्यान शिवसेना नेत्यांनी भाजपने आजवर केलेल्या अन्यायाचा पाढा बावनकुळे यांच्यासमोर वाचला, त्यावर बावनकुळे यांनी मी अत्यंत छोटा नेता असल्याचे नमूद केल्याची खमंग चर्चा आज राजकीय वर्तुळात सुरू होती. शिवसेनेशी संपर्क साधून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजप प्रदेशाध्यक्षांच्या विवाहसमारंभाला हजर राहतील का, असे विचारले असता त्याच दिवशी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या घरी कोल्हापुरातही लग्नसमारंभ असल्याचे सांगण्यात आले.

शिवसेना नेत्यांनी गेले काही दिवस युतीबद्दलची मते अत्यंत स्पष्टपणे उद्धव यांच्यापर्यंत पोचविणे सुरू ठेवल्याचे सांगण्यात येते. मुंबईत भाजपचे आव्हान स्वीकारून पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या शिवसेनेने पडते घेतल्यास सैनिकांना ते आवडणार नाही, असा यातला सूर आहे. शिवसैनिक हा भाजपच्या मतदार आणि कार्यकर्त्यापेक्षा कमालीचा एकजिनसी तसेच कडवा असल्याने परतीचा निर्णय त्याला रुचणार नाही असे सांगितले जाते.

"युतीसाठी नमते घ्या' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेचाही शिवसैनिकांवर परिणाम झाला नसून हे विधान सत्य असेल काय, असा प्रश्‍न केला जातो.

युती बांधून ठेवण्याची इच्छा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आहे असे आम्हाला वाटत असे, पण खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांची शक्‍यता तपासून पाहिली जाईल, असे विधान करीत थेट मातोश्रीवर त्यांनी अविश्‍वास दाखविल्याची खंत शिवसेनेच्या एका प्रवक्‍त्याने आज व्यक्‍त केली. हे विधान मतदानाच्या आदल्या दिवशी करणे म्हणजे बुद्धिभेद नव्हे काय, असा प्रश्‍नही या प्रवक्‍त्याने केला.

आज भाजपचे ज्येष्ठ नेते कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या मुलाच्या, आमदार आकाश याच्या विवाहसोहळ्याला खामगाव येथे शिवसेनेचे नेते परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे आवर्जून हजर होते. त्यामुळे कार्यकर्ते तुटेस्तोवर ताणायला हवे या भावनेचे असताना मंत्री आणि आमदार वेगळी भूमिका "मातोश्री'वर व्यक्त करतील, अशी शक्‍यता भाजपमध्ये व्यक्‍त केली जात होती.

मंत्र्यांच्या बैठकीची चर्चा
शिवसनेने आपल्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलाविल्याची चर्चा बुधवारी होती. कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा हाती घेण्याची शक्‍यता वर्तवली जात होती, पण अशी कोणतीही बैठक संध्याकाळपर्यंत झाली नव्हती. महापौरपदाची निवडणूक कोणत्या तारखेला व्हावी हाही वादाचा विषय झाला आहे. उत्तर प्रदेशातील मतदानानंतरची तारीख ठरवली तर वेगळे चित्र असेल असे सांगितले जात होते. उद्या (ता. 2) प्रमुख नेते आंगणेवाडीच्या जत्रेकडे निघणार असून, शिवसेनेच्या नगरसेवकांना पाच तारखेला अज्ञात स्थळी नेण्यात येणार असल्याच्या कहाण्याही आज चर्चेत होत्या.

Web Title: shivsena politics in mumbai