
Shivsena Row : "आता आम्हाला शिवसेना म्हणायचं"; शिंदे गटाने पत्रक काढत केलं जाहीर
निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे. यानंतर आता शिंदे गटाकडून एक पत्रक काढण्यात आलं आहे.
निवडणुकीच्या निर्णयानुसार पक्षाचे नाव व चिन्ह शिंदेंना मिळाले असून या पुढे माध्यमांनी शिंदेगट न उच्चारता 'शिवसेना' असे उच्चारावे, असं पत्र पक्ष सचिव संजय मोरे यांच्याकडून जाहीर करण्यात आलं आहे.
शिवसेनेतला वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या वादाचा चेंडू निवडणूक आयोगाकडे टोलवला होता. त्यामुळे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार, याचा निर्णय अनेक दिवस प्रलंबित होता. त्यानंतर आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव तर मशाल हे चिन्ह दिलं आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि ढाल हे चिन्ह दिलं.
या चिन्हांवर आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व इथल्या जागेसाठीची पोटनिवडणूक झाली. यानंतर आता निवडणूक आयोगाने निर्णय दिला आणि शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं.