
Shivsena Row : ठाकरे गटाकडे असलेलं एकमेव पदही धोक्यात; शिंदेंच्या शिवसेनेचा त्याच्यावरही डोळा
निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं. त्यामुळे आता ठाकरे गटामध्ये नाराजीचं वातावरण आहे. अशातच आता पक्षच शिंदेंचा झाल्याने त्यांनी जाहीर केलेला व्हीप ठाकरेंनाही पाळावा लागणार आहे. ही ठाकरेंची मोठी अडचण ठरू शकते.
नाव, चिन्हानंतर आता ठाकरे गटाचं विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद घालवण्यासाठी हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे. सध्याच्या शिवसेनेच्या आमदारांपैकी किंवा अपक्ष आमदारांपैकी कोणाची विधानपरिषद सभागृह गटनेते नियुक्ती करत व्हिप जारी करता येऊ शकतो.
हेही वाचा - स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...
ह्या व्हीपची अंमलबजावणी झाली तर त्याचं पालन करणं शिवसेनेतल्या सगळ्याच सदस्यांना अनिवार्य असेल. हा आदेश उद्धव ठाकरेंनाही मान्य करावं लागेल. या व्हीपचं उल्लंघन झाल्यास संबंधित नेत्यावर व्हीपच्या उल्लंघनाची कारवाई होऊ शकते.
उद्धव ठाकरेंची व्हीपबाबत स्पष्ट भूमिका...
उद्धव ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्हीपबद्दलची आपली भूमिकाही स्पष्ट केली. ठाकरे म्हणाले, "व्हीप पाळला नाही तर आमदार अजिबात अपात्र होऊ शकत नाहीत. कारण दोन गटांना मान्यता मिळाली तेव्हा दोन गट आहेत हे मान्य करण्यात आले होते. तेव्हा त्यांना एक चिन्ह आम्हाला देण्यात आलं होतं. मूळ नाव आणि चिन्ह खातरजमा केल्याशिवाय ते देऊ शकत नव्हते. आम्ही त्याला चॅलेंज केलं आहे. त्या गटाला निवडणूक आयोगाने नाव आणि चिन्ह दिलं आहे. आमच्या गटाचा आणि त्यांच्या गटाचा काही संबंध नाही असे ठाकरे यांनी स्पष्ट केलं."