शिवसेनाही स्वबळाच्या तयारीत

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 28 जुलै 2019

विदर्भातील नाईक घराणे, पश्‍चिम महाराष्ट्रात शिंदे कुटुंब अशी नवी मंडळी समोर येत आहेत. त्यामुळे सेनेने वेळ आली तर निश्‍चितपणे स्वबळाचा मार्ग पत्करावा असे नमूद केले जात आहे.

मुंबई : भाजपचे कार्यकर्ते स्वबळाचा आग्रह धरत असल्याने सावध होत शिवसेनेनेही स्वबळाची तयारी सुरु केली आहे. गेल्या निवडणुकीतला अनुभव लक्षात घेता ताकही फुंकून पिणे आवश्‍यक असल्याचे उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांचे मत आहे. भाजपच्या तसेच विरोधी पक्षांनी करून घेतलेल्या सर्वेक्षणात वेगळे लढण्याचा निर्णय घेतला तरी भाजपला बहुमत मिळेल असे निष्कर्ष निघाले आहेत. त्यामुळे भाजप स्वबळावर लढणार अशी शक्‍यता निर्माण झाली आहे. शिवसेनेने यातून योग्य तो धडा घ्यावा असे, त्यांच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

सध्या शिवसेनेने जिल्हा स्तरावरील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू ठेवल्या आहेत. त्या अंतर्गत सेनेच्या निवडून आलेल्या आमदारांच्या मतदारसंघातील परिस्थिती अत्यंत उत्तम असल्याचे आढळून आले आहे. मोदी लाटेत तगून राहिलेल्या या आमदारांना पुन्हा संधी मिळणार हे निश्‍चित आहे. कोकण तसेच मराठवाड्यात सेनेपुढे भाजप निष्प्रभ ठरणार आहे. सेनेला काही भागात नव्या नेत्यांचा पाठिंबा मिळेल.

विदर्भातील नाईक घराणे, पश्‍चिम महाराष्ट्रात शिंदे कुटुंब अशी नवी मंडळी समोर येत आहेत. त्यामुळे सेनेने वेळ आली तर निश्‍चितपणे स्वबळाचा मार्ग पत्करावा असे नमूद केले जात आहे. संजय राउत, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे यांच्याशी या संदर्भात चर्चा केली गेली असल्याचे समजते. भाजपने काय करायचे ठरवले आहे, यावर सेनेचा निर्णय अवलंबून असेल असे समजते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena too ready for upcoming Vidhansabha Elections