
Shivsena : घड्याळाचे काटे मागे फिरणार नाही, आता उद्धव ठाकरे...; राजकीय तज्ञांचे मत
मुंबई : मुंबई, ता. ११ : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज अंतिम फैसला सुनावला. हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या अपेक्षेप्रमाणे लागलेला नाही. मात्र पुढच्या राजकीय संघर्षात टिकून राहण्याची शिदोरी या निर्णयाने ठाकरे यांना दिली असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. मात्र सहानूभूती आणि नैतिकतेचे कार्ड उद्धव ठाकरे कसे खेळतात यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मनाप्रमाणे हा निकाल लागलेला नाही.संघटना कुणाकडे याचाही फैसला झाला नाही. त्यामुळे घडाळ्याचे काटे उलटे फिरणार नाही. हे सत्य समजून घेवून ठाकरे यांना नवी संघटना घेवून काम सुरु करावे लागेल. ठाकरे यांच्या पाठीशी जनतेची बऱ्यापैकी सहानूभूती आहे.
आतापर्यंत झालेल्या सर्व स्थानिक निवडणूक, पोटनिवडणूकांचे निकालाकडे पाहील्यास जर महाविकास आघाडीने एकजुटीणे निवडणूका लढवल्यास ते भाजपचा पराभव करु शकतात हे सिध्द झाले आहे. महत्वाचे म्हणजे यात शिंदेचा पक्ष फार प्रभाव पाडू शकला नाही. त्यामुळे उध्दव ठाकरे यांना नव्या मित्रासोबत वाटचाल करावी लागेल हे स्पष्ट आहे.
- प्रा. हरिश वानखेडे, जवाहरलाल नेहरु विद्यापीठ
हा निकाल १०० टक्के उद्धव ठाकरे यांच्या बाजूला लागला नाही हे खरे असले तरी या निकालाने ठाकरे यांना पुढच्या राजकीय संघर्षासाठी नैतिक उर्जा दिली आहे. मी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडली, त्याची किंमत मोजली. ही नैतिक लाईन ठाकरे यांना घेता येईल. उद्धव ठाकरे यांना लोकांची सहानूभूती आहे मात्र ती इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी यांना मिळालेल्या सहानूभूतीएवढी निश्चितचं नाही. त्यामुले मुंबईबाहेर ते याचा कसा वापर करणार आहे यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असणार आहे. मात्र या दरम्यान मिळालेल्या वेळेचा वापर करुन ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन मुख्य विरोधी पक्षात अस्थिरता आणण्यात भाजप यशस्वी झाला आहे.त्यामुळे महाविकास आघाडीपुढची लढाई एवढीही सोपी नाही.
- प्रा.सुमित म्हसकर,ओ. पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी
या निकालानंतर सोशल मिडीयावरील प्रतिक्रीया बघीतल्यास, उद्धव ठाकरे यांना मोठ्या प्रमाणावर सहानूभूती मिळतांना दिसत आहे.केवळ सहानूभूतीच्या आधारे निवडणुका जिंकणे शक्य नाही.आज ४० आमदार, ११ खासदार आणि काही पदाधिकारी पक्षाबाहेर निघून गेले आहे. या मुळे निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्यासाठी नवे नेतृत्व तयार करावे लागेल, संघटनेची नव्याने उभारणी करावी,संसाधने उभारावी लागेल. केवळ पत्रकार परिषदा, सभा घेवून ही पोकळी भरुन निघणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरावे लागेल. शेवटी या आधारावर निवडणूका लढवता येते.दुसरीकडे शिंदे यांच्या पक्षाचे नेते आणि भाजपकडून अजून खालच्या थरावरची टिका झाल्यास त्याचाही फायदा होईल.
- संजय पाटील, शिवसेना अभ्यासक