'शिवसेनेला हवे मुख्यमंत्रिपद'

सकाळ न्यूज नेटवर्क 
रविवार, 29 सप्टेंबर 2019

जगदंबेची पूजा युतीचे सदस्य सर्वजण एकत्र येऊन करू, अशी ग्वाही देत असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, एक दिवस शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवणार असल्याचे वचन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले असल्याची आठवण काढत मुख्यमंत्रिपदावर थेट दावा केला आहे.

मुंबई : जगदंबेची पूजा युतीचे सदस्य सर्वजण एकत्र येऊन करू, अशी ग्वाही देत असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, एक दिवस शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवणार असल्याचे वचन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले असल्याची आठवण काढत मुख्यमंत्रिपदावर थेट दावा केला आहे. युतीमध्ये जागावाटपाचा तिढा सुटत नसतानाच उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्रिपदाचा होत असणारा आग्रह म्हणजे मुख्यमंत्रिपद अडीच वर्षांसाठी भाजपबरोबरच शिवसेनेकडेही असावे, असा संकेत देणारा आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेतील इच्छुक उमेदवार जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांना मार्गदर्शन शिबिर रंगशारदा येथे घेण्यात आले होते. युती होणार असल्याचे वारंवार सूचित करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मागची पाच वर्षे ही संघर्षाची होती; पण एक ना एक दिवस शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री करणारच असल्याचेही विधान केले. आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपद हे दोन्ही पक्षांकडे अडीच-अडीच वर्षांसाठी असायला हवे असे अप्रत्यक्षरीत्या सूचित करत शिवसेनेचा मुख्यमंत्री निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले. 

युतीची घोषणा एक-दोन दिवसांत 

युती होणारच असल्याचे सांगतानाच, "वैर केले तर आम्ही उघडपणे करतो आणि युती केली तर आम्ही पाठीमागून सुरा मारत नाही' अशा शब्दांत ठाकरे यांनी इशारा दिला. भाजपचे नेते अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत युतीच्या जागावाटपांबाबत चर्चा होत आहे. काही जागांवरून अद्याप चर्चा सुरू असून, येत्या एक ते दोन दिवसांत युतीची घोषणा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

ठाकरे म्हणाले... 

- शिवसैनिक माझ्यासोबत असतील तर मी कोणताही "टर्न' घेऊ शकतो. 
- "युतीचे उमेदवार निवडून आणा; गद्दारी करू नका, असाही इशारा त्यांनी शिवसैनिकांना दिला. 
- भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठीही शिवसेनेची ताकद लावा. 

महाराष्ट्रात सूडाचे राजकारण नको 

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावरील "ईडी'च्या कारवाईवरून झालेल्या प्रकरणाचाही समाचार घेतला. ते म्हणाले, ""महाराष्ट्रात सूडाचे राजकारण नको. कोणी जर सूड उगवण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र त्याच्यावर आसूड उगारल्याशिवाय राहणार नाही; पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही अशाप्रकारे सूडाने कारवाई करण्यात आली होती, त्या वेळी कोणी मध्यस्थी करण्यास आले नसल्याची आठवणही या वेळी त्यांनी काढली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena want Chief Minister Post Maharashtra Vidhan Sabha 2019