बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करण्याची शिवसेनेची मागणी

ज्ञानेश्‍वर बिजले
सोमवार, 9 जुलै 2018

मुंबई अहमदाबाद दरम्यानचा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करण्याची मागणी करीत शिवसेनेने या संदर्भात विधान परिषदेत अल्पकालीन चर्चेची मागणी विधान परिषदेच्या सभापतींकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहणाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसनेही या प्रकल्पाबाबत आक्रमक भूमिका घेतल्यामुळे ही चर्चा वादळी ठरण्याची शक्‍यता आहे. 

नागपूर - मुंबई अहमदाबाद दरम्यानचा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करण्याची मागणी करीत शिवसेनेने या संदर्भात विधान परिषदेत अल्पकालीन चर्चेची मागणी विधान परिषदेच्या सभापतींकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहणाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसनेही या प्रकल्पाबाबत आक्रमक भूमिका घेतल्यामुळे ही चर्चा वादळी ठरण्याची शक्‍यता आहे. 

शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे, ऍड. अनिल परब, गोपीकिशन बिजोरिया, रवींद्र फाटक आदींनी विधान परिषद नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चेची सूचना दिली आहे. या प्रकल्पासाठी एक लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्याचे भूमीपूजन भारत व जपानच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी झाले. महाराष्ट्रातील सुमारे चारशे हेक्‍टर जमीन त्यासाठी संपादित करावी लागणार असून, 70 गावांतील शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला आहे. शिवसेनेच्या आमदारांना त्यांनी या बाबतचे ठराव दिले आहेत.

यासह अनेक बाबी असून, बुलेट ट्रेनचा प्रकल्प रद्द करून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठ्या योजना राबविण्याची शिवसेनेची मागणी असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. 
नाणार प्रकल्प आणि बुलेट ट्रेनला विरोध करण्याची भूमिका शिवसेनेने घेतली असून, त्यामुळे या चर्चेला तोंड देताना सत्ताधारी भाजपला अवघड जाणार आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यांतील जमीन यांसाठी लागणार असून, काही गावांतील जमिनीचे सर्वेक्षण झाले आहे. या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्‍न कॉंग्रेसच्या आमदारांनी उपस्थित केला आहे.

Web Title: shivsena wants to discuss on bullet train