शिवस्मारकाचे श्रेय भाजप घेणार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 21 डिसेंबर 2016

मुंबई - अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करून भाजप "शतप्रतिशत' राजकीय श्रेय घेणार आहे. मोदी यांच्या हस्ते येत्या 24 डिसेंबर रोजी भूमिपूजन करून मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ भाजप फोडणार असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जाते.

मुंबई महानगरपालिका निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये होणार आहे. पालिकेच्या 2012मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होऊन जागावाटप झाले होते. मात्र, यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप केंद्रात आणि राज्यात सत्तेत आला. मात्र, विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. त्यानंतर झालेल्या कल्याण-डोंबिवली निवडणुकीतही हे दोन्ही पक्ष वेगळे लढले. सत्तेत मात्र एकत्र आले. त्याच धर्तीवर मुंबई महापालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष वेगळे लढणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भाजप केंद्र व राज्य पातळीवर घेतलेले निर्णय आणि केलेली कामे याचा पुरेपूर राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जाते. परिणामी अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा प्रचार व प्रसार भाजप जोरदारपणे करणार आहे.

महापालिकेत कोणत्याही परिस्थितीत भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करतानाचा केलेल्या कामांचे मार्केटिंग करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मंजुऱ्या, मुंबईतील मेट्रो प्रकल्प यानंतर आता या स्मारकाचे भूमिपूजन करून शिवसेनेच्या "करून दाखवलं' घोषणेला राजकीय शह देण्याचे काम भाजपकडून केले जाणार आहे.

Web Title: shivsmarak take credit for BJP