#ShivSmarak ठरावे उर्जाकेंद्र

व्यंकटेश कल्याणकर
शनिवार, 24 डिसेंबर 2016

असे असेल #ShivSmarak

  • 16 हेक्टर क्षेत्रावर
  • 3,600 कोटी रूपयांचा प्रकल्प
  • पूर्ण स्मारकाची उंची असेल २१० मीटर
  • अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यापेक्षाही

नाव घेताच शरीरावर रोमांच उभे राहावेत...
छाती अभिमानाने फुलून यावी...
शरीरातील रक्त सळसळावे...
शत्रूंनी श्‍वास थांबवावा...
इतिहासाच्या ओठांवर हसू फुलावे...
कर्तृत्त्व, धैर्य, शौर्य यांनाही अभिमान वाटावा...
छत्रपती शिवाजी महाराज या अक्षरांची ही जादू आहे.
शिवराय. शिवबा. या अक्षरांनी जपलेले हे प्रेम आहे.

समशेरींना शत्रूच्या रक्ताचे अभिषेक करत कितीतरी सामर्थ्यशाली शत्रूला राजांनी आक्रमण करून पराक्रमाने याच मातीत गाडून टाकले. हजारो मावळ्यांच्या मनात स्वराज्याची बीजे रोवली. त्यांना लढण्यासाठी, पळण्यासाठी, पडले तर पुन्हा उठण्यासाठी आणि उठून पुन्हा लढण्यासाठी प्रेरित केले. असे आमचे राजे शिवछत्रपती.

आमचा राजा जेवढा शत्रूसाठी कडक होता, तेवढेच ते जनतेवर प्रेम करणारे. काल, आज आणि उद्या आमचा राजा आमच्यासाठी पराक्रमाचे प्रतिक आहे. मनामनात आणि हृदयाहृदयात. महाराजांचे नाव, महाराजांची प्रतिमा आणि महाराजांचा पुतळा आम्हाला लढण्याची, जगण्याची प्रेरणा देत आहे. आज या पृथ्वीतलावरील अरबी समुद्रावर महाराष्ट्राने आपल्या अद्वितीय राजाचे तितकेच भव्यदिव्य स्मारक उभे करण्यास सुरूवात केली.

हे स्मारक केवळ आम्हाला नव्हे तर येणाऱ्या हजारो पिढ्यांना लढण्याची प्रेरणा देत राहील. हे स्मारक म्हणजे केवळ स्मारक नसेल तर पराक्रमाचा, तंत्रज्ञानाचा, कल्पकतेचा या पृथ्वीतलावरील अभूतपूर्व आविष्कार असेल. महाराज, आज मार्गशीर्ष कृष्ण एकादशी. आजच्याच तिथीला तुम्ही एकेकाळी समुद्रातील सिंधुदुर्ग उभारण्यासाठी भूमिपूजन केले होते.

महाराज, तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करून, प्रसंगी मावळ्यांचे रक्त सांडून मोठ्या पराक्रमाने मिळविलेल्या गड-किल्ल्यांवरील माती आणि पवित्र नद्यांमधील पाणी आम्ही तुमच्या स्मारकस्थळी अर्पण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जहाजातून स्मारकस्थळी जाऊन तुमच्या स्मारकस्थळी जलपूजन आणि भूमिपूजन केले. महाराज, आजचा हा ऐतिहासिक क्षण प्रत्येक मराठ्याने हा ऐतिहासिक आणि आनंदक्षण डोळ्यांनी अनुभवला आणि हृदयात साठवला. महाराज, या स्मारकस्थळी जगातील प्रत्येक जण तुमच्या कर्तृत्त्वासमोर नतमस्तक होण्यासाठी येत राहील.

महाराज, आज या आनंदक्षणी आमच्या मस्तकावर हात ठेवा. आम्हाला आशीर्वाद आणि सद्‌बुद्धी द्यावी महाराज...
तुम्ही घालून दिलेल्या पराक्रमाच्या, नम्रतेच्या आणि प्रेमाच्या मार्गावरून पुढे जाण्यासाठी आशीर्वाद द्यावा महाराज...
आमच्या हातून बहुतजनांचे कल्याण होण्यासाठी आम्हाला सद्‌बुद्धी द्यावी महाराज...
आमच्या मनात दीनदलितांबद्दल करूणा निर्माण होण्यासाठी सद्‌बुद्धी द्यावी महाराज...
सुप्रशासन निर्माण करण्यासाठी मस्तकावर हात ठेवा महाराज...
इथल्या मातीवर झालेल्या आक्रमणाला इथेच गाडून टाकण्याचे सामर्थ्य आमच्या बाहुत निर्माण होण्यासाठी पाठिवर हात राहु द्या महाराज...
महाराज, अखेरीला एकच सांगणे. इथल्या प्रत्येक मावळ्या आणि भगिनीशी आपुलकीने, नम्रपणे, प्रेमाने, ममत्त्वाने वागण्याची बुद्धी द्या महाराज....

 

असे असेल #ShivSmarak

  • 16 हेक्टर क्षेत्रावर
  • 3,600 कोटी रूपयांचा प्रकल्प
  • पूर्ण स्मारकाची उंची असेल २१० मीटर
  • अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यापेक्षाही
Web Title: Shivsmarak will be Energy centre