'उद्धव ठाकरेंनी दिली होती बाळासाहेबांना धमकी'

मंगळवार, 7 मे 2019

- नारायण राणे यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रातून आली ही माहिती समोर.

मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी आत्मचरित्रात लिहिलेल्या काही बाबी आता समोर आल्या आहेत. यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तत्कालीन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मीसह घर सोडून जाऊ, अशी धमकी दिली होती.  

नारायण राणे यांनी आत्मचरित्रात लिहिले, की 14 एप्रिल 2005 रोजी रवींद्र नाट्य मंदिरात चुकीच्या पद्धती शिवसैनिकांसमोर आणण्याचा मी प्रयत्न केला होता. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी मला पक्षातून काढण्याची मागणी केली. मी राजीनामा दिल्यानंतर बाळासाहेबांनी मला फोन केला होता. ज्यावेळी याबाबत उद्धव ठाकरेंना समजले, तेव्हा ते बाळासाहेबांकडे गेले. तेव्हा ते म्हणाले, नारायण राणे पक्षात परत आल्यास मी आणि रश्मी ठाकरे घर सोडून जाऊ. 

दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्यामुळेच शिवसेनेची वाट लागली, असा आरोपही नारायण राणे यांनी यावेळी केला. 

माझ्यासाठी मुख्यमंत्रिपद सोडावं लागल्याने जोशींमध्ये राग

माझ्यासाठी मुख्यमंत्रिपद सोडावे लागल्याने जोशींच्या मनात एक प्रकारचा राग होता. जरी मनोहर जोशी शिवसेनेचे चिंतक वाटत असले तरी त्यांच्या निर्णयामुळे पक्षाची आज अशी परिस्थिती झाली आहे.