
सोलापूर : नॅक मूल्यांकन करून न घेतलेल्या महाविद्यालयांवर राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित जवळपास २२ महाविद्यालयांवर कारवाईची शक्यता आहे. तुकडीला कोणाचीही मान्यता न घेता नियम डावलून ४० ते ११० टक्के वाढीव प्रवेश दिल्याचीही गंभीर बाब समोर आली आहे. २५ सप्टेंबरला होणाऱ्या विद्या परिषदेच्या बैठकीत अंतिम निर्णय ठरणार आहे.
उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारावा, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, पायाभूत सुविधा मिळाव्यात, यासंदर्भात बंगळुरूच्या नॅक कमिटीकडून मूल्यांकन होत असते. त्यांच्याकडून मूल्यांकन करून घेतलेल्या महाविद्यालयांना शासनाकडून वेगवेगळ्या योजनांमधून निधी दिला जातो. मात्र, विद्यापीठाशी संलग्नित काही अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकनच करून घेतलेले नाही.
दुसरीकडे दहा टक्के नैसर्गिक प्रवेश वाढीला परवानगी असतानाही अनेक महाविद्यालयांनी तब्बल ११० टक्क्यांपर्यंत प्रवेश वाढविल्याची गंभीर बाब समोर आली आहे. अशा महाविद्यालयांवर कडक स्वरूपाची कारवाई होणार असून त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. आता सुरवातीला त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली जाणार आहे. समाधानकारक उत्तर न दिलेल्या महाविद्यालयांचे प्रस्ताव विद्यापीठाकडून उच्च शिक्षण मंत्रालयाकडे पाठविले जाणार आहेत.
कुलगुरुंनी शोधली निकालास विलंबाची कारणे...
काही सत्र परीक्षांचा निकाल १० ते ३० दिवसांत जाहीर होतो तर काही परीक्षांच्या निकालास विलंब होतो, अशी स्थिती मागील काही वर्षांपासून सुरु आहे. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. राजनीश कामत यांनी त्याची कारणे शोधली. त्यावेळी काही महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाची तुकडी विनापरवाना सुरु करण्यात आली असून द्वितीय वर्षाची तुकडी देखील तशीच चालविली जात असल्याची बाब समोर आली. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणारे, तत्पूर्वी अध्यापन करणारे प्राध्यापक तेवढेच असतात, मात्र विद्यार्थी वाढलेले असतात, हेही समोर आले. त्यामुळे आता अशा महाविद्यालयांवर दंडात्मक कारवाई केली होऊ शकते.