श्री विठ्ठल मंदिर संरक्षित स्मारक व्हावे म्हणून प्रस्ताव पाठवणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

पंढरपूर - श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर केंद्र अथवा राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत नाही. तरीही मंदिराचे महत्त्व लक्षात घेऊन मंदिर संरक्षित स्मारक म्हणून घोषित व्हावे, यासाठी सरकारकडे प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती पुरातत्व विभागाचे पुणे येथील सहायक संचालक विलास वहाने यांनी बोलताना दिली.

पंढरपूर - श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर केंद्र अथवा राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत नाही. तरीही मंदिराचे महत्त्व लक्षात घेऊन मंदिर संरक्षित स्मारक म्हणून घोषित व्हावे, यासाठी सरकारकडे प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती पुरातत्व विभागाचे पुणे येथील सहायक संचालक विलास वहाने यांनी बोलताना दिली.

मंदिरात काही वर्षांत चुकीच्या पद्धतीने केलेली बांधकामे हटविण्याची गरज आहे. त्यासाठी स्ट्रक्‍चरल ऑडिट करून मंदिराच्या संवर्धनासाठी कोणते उपाय करावे लागतील याचा अहवाल देणार असल्याचे वहाने यांनी सांगितले. वहादे, पी. डी. साबळे, आर्किटेक्‍ट प्रदीप देशपांडे व त्यांच्याबरोबरच्या दहा सहकाऱ्यांनी रविवारी (ता. 20) मंदिराची पाहणी केली. श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर हे पुरातन काळातील स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराच्या संवर्धनासाठी वेळोवेळी अनेक प्रकारची बांधकामे केली. काही ठिकाणी हवा येण्यासाठी झरोके तयार केले. वातानुकूलित यंत्रणेसाठीची व्यवस्था करतानाही चुकीच्या पद्धतीने बदल केले. श्री विठ्ठल मंदिराच्या छतावर टाकण्यात आलेला स्लॅब व अनावश्‍यक वजनाचा भार मूळ मंदिराच्या बांधकामावर पडला आहे. मंदिरातील गाभाऱ्यात ग्रेनाइट व संगमरवरी फरश्‍या बसवल्या; परंतु त्याची आर्द्रता मूर्तीच्या दृष्टीने घातक ठरू शकते. सुधारणेच्या नावाखाली काही वर्षांत मंदिराचे मूळ स्वरूप नाहीसे झाले आहे.

मंदिराच्या विविध भागांतील दगडांची केलेली रंगरंगोटी, नवीन बांधकामांचे बोजे, चुकीच्या पद्धतीचे वायरिंग या सर्वांची पाहणी करून अहवाल दिला जाणार असल्याचे पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले. मंदिराचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केल्यानंतर मंदिराच्या संवर्धनासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. श्री विठ्ठल मंदिर केंद्र आणि राज्य पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित येत नाही. त्यामुळे मंदिर समितीने पत्रव्यवहार करून आवश्‍यक कामे करण्याविषयी पुरातत्त्व विभागास अहवाल देण्याची मागणी केली होती. त्यानुसार पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यांच्याकडून अहवाल मिळाल्यावर आवश्‍यक कामे केली जाणार आहेत.

Web Title: Shri Vitthal temple will send a proposal to be a protected monument