'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रात' सिंधुदुर्ग प्रथम

विशाल पाटील
बुधवार, 22 मार्च 2017

सातारा जिल्हा दुसरा; राज्यातील 1.60 कोटी विद्यार्थ्यांच्या चाचणीचे अनुमान

सातारा जिल्हा दुसरा; राज्यातील 1.60 कोटी विद्यार्थ्यांच्या चाचणीचे अनुमान
सातारा - प्रत्येक मूल शिकले पाहिजे, या हेतूने शिक्षण संचालनालयाने "प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र' हा उपक्रम यंदा राज्यभरात राबविण्यात आला. त्यातील भाषा व गणित विषयांसाठी झालेल्या पायाभूत चाचणी व संकलित मूल्यमापन चाचणी एकचे विश्‍लेषण नुकतेच विद्या प्राधिकरणाने जाहीर केले. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम, सातारा द्वितीय, तर रत्नागिरी जिल्ह्याने तृतीय क्रमांक मिळविला.

पहिली ते आठवीतील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या भाषा व गणित विषयातील गुणवत्तेची नियमित पडताळणी करण्यासाठी शिक्षण विभागाने चालू शैक्षणिक वर्षापासून "प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र' उपक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या मान्यता प्राप्त शाळांतील पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात आले. राज्यातील एक कोटी 60 लाख विद्यार्थ्यांची वर्षभरात तीन वेळा शैक्षणिक प्रगती चाचणी, पायाभूत चाचणी व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनातील संकलित मूल्यमाफनाच्या दोन चाचण्या घेण्यात आल्या. त्यातील पायाभूत चाचणी व संकलित चाचणी एकचा भाषा व गणित विषयातील गुण शाळांनी "सरल' प्रणालीत भरली होती.

त्याअनुषंगाने विद्या परिषदेने त्याचे निष्कर्ष काढले असून, नुकतेच ते जाहीरही केले.

भाषा विषयात सिंधुदुर्ग जिल्ह्यास 82.82 टक्‍के, साताऱ्याला 80.63, रत्नागिरीला 80.61, नगरला 78.74, सोलापूरला 77.11 टक्‍के गुण मिळाले, तर गणित विषयात सिंधूदुर्ग जिल्ह्याला 83.66 टक्‍के, साताऱ्याला 81.56, रत्नागिरीला 80.96, कोल्हापूरला 79.64, पुणे जिल्ह्यास 79.36 टक्‍के गुण मिळाले. भाषा विषयात सर्वात कमी नंदुरबार जिल्ह्यास 59.35, त्यापाठोपाठ अकोला व गडचिरोली जिल्ह्यास 64.41 टक्‍के गुण मिळाले. गणित विषयात नंदूरबारला सर्वात कमी 60.08, गडचिरोलीला 65.29 टक्‍के मिळाले आहेत. 60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा हे जिल्हे अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकावर आहेत.

पायाभूत चाचणीत भाषा विषयात उच्चतम गुण संपादन करणाऱ्या 20 तालुक्‍यांत प्रथम क्रमांक वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग), द्वितीय वाई (जि. सातारा), तृतीय क्रमांक सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) या तालुक्‍यांनी मिळविला. यामध्ये तब्बल सात तालुके सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. कमी गुण मिळविणाऱ्या 20 तालुक्‍यांत सहा तालुके गडचिरोलीचे आहेत. गणित विषयात उच्चतम गुण संपादन करणाऱ्या 20 तालुक्‍यांत प्रथम क्रमांक वाई (जि. सातारा), द्वितीय मालवण (जि. सिंधुदुर्ग), तृतीय क्रमांक जावळी (जि. सातारा) या तालुक्‍यांनी मिळविला. यातही सिंधुदुर्गमधील सात तालुके आहेत. सर्वांत कमी गुण धडगाव (जि. नंदूरबार) तालुक्‍यास मिळाले. संकलित मूल्यमापनातील भाषा विषयात वाई (जि. सातारा), गणित विषयात जावळी (जि. सातारा) या तालुक्‍यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

पायाभूत चाचणीतील भाषा विषयात घाटकोपर (मुंबई) येथील एएफएसी इंग्लिश स्कूल हे केंद्र, तर गणित विषयात अमरावतीतील वॉर्ड नंबर 54 केंद्र राज्यात अव्वल ठरले. संकलित मूल्यपानातील भाषा विषयात लातूरमधील लाल बहादूर शास्त्री केंद्र, गणित विषयात साताऱ्यातील केडंबे केंद्र राज्यात अव्वल ठरले. पहिल्या 50 मध्ये साताऱ्यातील दहा केंद्रांचा समावेश आहे. याचे जिल्हानिहाय विश्‍लेषणही संकेतस्थळावर उपलब्ध केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची गुणवत्ता यातून पुढे येत आहे.

Web Title: sindhudurg number one in advanced academic Maharashtra