शुक्रतारा निखळला; ज्येष्ठ गायक अरुण दाते यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

शुक्रतारा मंदवारा, शतदा प्रेम करावे, भातुकलीच्या खेळामधली... अशा अजरामर भावगीतांनी मराठी श्रोत्यांच्या मनात अरुण दाते यांनी स्थान मिळवले होते. त्यांचा जन्म ४ मे १९३४ मध्ये इंदूर येथे झाला.

मुंबई - आपल्या भावसंगीताने रसिकांच्या मनात शुक्रताऱ्याचे स्थान मिळवणारे मखमाली आवाजाचे गायक अरुण दाते यांचे आज पहाटे कांजूरमार्ग येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात मुलगा अतुल, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायन येथील स्मशानभूमीत सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्यामुळे भावगीतातील एक सुस्वर निमाला असला तरी ‘असेन मी नसेन मी, परि असेल गीत हे’ या त्यांच्या गाण्याप्रमाणेच त्यांच्या आठवणींचा शुक्रतारा रसिकमनात तेजाळत राहील, अशी प्रतिक्रिया अनेक रसिकांनी व्यक्त केली आहे. 

अरुण दाते यांना संगीताचा समर्थ वारसा लाभला होता. त्यांचे वडील रामूभैय्या संगीतातील मोठे जाणकार होते. इंदोरमधील त्यांच्या घरी अनेक संगीतकारांचे, साहित्यिकांचे जाणे-येणे होते. आपल्या परिवारात अरु या टोपणनावाने ओळखले जाणाऱ्या अरविंद उर्फ अरुण दातेंना त्यामुळे अनेक मान्यवरांचा सहवास आणि आशीर्वाद लाभला. साक्षात कुमार गंधर्वांकडून त्यांनी गाण्याचे सुरुवातीचे शिक्षण घेतले. एका बाजूला अभियांत्रिकीचा अभ्यास करताना त्यांनी के. महावीर यांच्याकडून संगीताचेही शिक्षण घेतले. गझल गायनाची उत्कट आवड असलेल्या अरुण दातेंनी १९५५ पासूनच आकाशवाणीवर त्या सादर करायला सुरवात केली होती. त्यांचा मखमाली आणि भावपूर्ण आवाज ऐकूनच श्रीनिवास खळे यांनी मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेला ‘शुक्रतारा’ त्यांच्याकडूनच गाऊन घेण्याचा आग्रह धरला. त्यावेळी प्रकाशमान झालेला तो ‘शुक्रतारा’ आजही रसिकमनाला अमाप आनंद देत आहे.

‘दाते घराण्यातला जन्म, भाईंचा (पुल) आशीर्वाद आणि कुमार (गंधर्वांचा) आशीर्वाद यामुळेच माझं गाणं सजलं’ असं मानणाऱ्या अरुण दातेंचा गाणे हाच श्‍वास आणि ध्यास होता. मराठी भावगीतांना त्यांनी नवा आयाम दिला. श्रीनिवास खळे, अरुण दाते आणि मंगेश पाडगावकर यांनी अनेक अजरामर भावगीते दिली. अर्थात यशवंत देव, हृदयनाथ मंगेशकर यांच्याबरोबरही त्यांनी अनेक सरस आणि तरल गाणी दिली आहेत. 

गेले काही दिवस अरुण दाते आजारी होते. अखेर आज सकाळी सहा वाजता त्यांनी आपल्या कांजूरमार्ग येथील राहत्या घरी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी त्यांच्या घरी जाऊन अंत्यदर्शन घेतले. ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव, संगीतकार मिलिंद इंगळे, अजित पाडगावकर, अच्युत पोतदार, गायक मंदार आपटे, गायक अनिकेत जोशी, तसेच संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर अंत्यसंस्काराच्यावेळी उपस्थित होते.

​***************************************

पूर्ण नाव     -     अरविंद रामचंद्र दाते 
टोपण नाव     -     अरुण, अरू 
जन्म     -     चार मे १९३४ 
मूळ गाव     -     इंदूर 
शिक्षण     -     बॅचलर ऑफ टेक्‍स्टाईल आणि   टेक्‍नॉलॉजिकल इंजिनिअर 
शाळा, महाविद्यालय -     महाराजा शिवाजीराव हायस्कूल व होळकर  महाविद्यालय, इंदूर व व्हीजेटीआय, मुंबई 
व्यवसाय     -     गायन
आवडते गाणे     -     या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
पुस्तक     -     ‘शतदा प्रेम करावे’ हे आत्मकथनपर पुस्तक  ७ मे १९९५ रोजी प्रसिद्ध झाले.

***************************************

सहृदय कलाकार - अनुराधा पौडवाल 
माझी आणि अरूदादांची (अरुण दाते यांची) ओळख एका कार्यक्रमातच झाली. ‘भावसरगम’ नावाचा एक कार्यक्रम होता. हृदयनाथ मंगेशकरांसोबत मी गाणार होते. तिथपासून आमची ओळख झाली आणि त्यानंतर आमचा संगीताचा सहप्रवास ४५ वर्षांपेक्षा जास्त काळ सुरूच राहिला. 

अरूदादा आणि माझे पती अरुण पौडवाल हे एकमेकांना चांगले ओळखायचे. ‘भावसरगम’ कार्यक्रमामुळे ओळख झाल्यानंतर मग आम्ही संगीताचे एकत्र कार्यक्रम करायला सुरुवात केली. त्या वेळी भावगीतांचे कार्यक्रम जास्त प्रमाणात होत असत. त्यासाठी प्रवासही खूप करावा लागे; पण कोणत्याही कार्यक्रमासाठी गेल्यावर त्यांनी माझी नेहमीच एखाद्या लहान बहिणीसारखी काळजी घेतली. मीही त्यांना मोठ्या भावाचा मान दिला. एकमेकांना अशी आत्मीयतेची साथ लाभल्याने आमचे कार्यक्रम नेहमीच उत्तम होत, रसिकांना आवडत. 

त्यांचं ‘शुक्रतारा’ हे गाणं प्रत्येक मराठी रसिकाच्या मनात अढळपद मिळवून राहिलं आहे. त्यामुळे कार्यक्रमानंतर त्यांना भेटायला नेहमीच गर्दी होई. मुळात त्यांना माणसं जोडायला आवडायचं, म्हणून ते नेहमीच लोकांच्या घोळक्‍यात असायचे. कार्यक्रम उत्तम व्हावा, यासाठीही ते मेहनत घेत. कुठे कार्यक्रम असले की ते सगळ्यांना रिहर्सलला बोलवायचे. त्यानिमित्ताने ते सगळ्यांना ज्याला जे हवंय ते खाऊ घालायचे. त्यांना सगळ्यांना खाऊ घालण्याची अत्यंत आवड होती. तसेच ते स्वतःही खवय्या होते. मी, रवी दाते, अरुदादा, नंदू होनप असा आमचा मोठा ग्रुप होता. ग्रुपमध्ये नेहमी खाणं हा महत्त्वाचा विषय असायचाच. 

एवढा मोठा माणूस असूनही त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर असायचे. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही होते. आज त्यांच्या आठवणी खूप येताहेत. एखादी कुटुंबातील व्यक्ती असेल तर एखाद-दुसरा किस्सा नसतो; तर त्यांच्या किश्‍श्‍यांमुळेच संपूर्ण आयुष्य व्यापलेले असते. तसे अरुदादा माझ्यासाठी होते. त्यांचे प्रेमाचे आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव आहेत, असं मी म्हणेन. 

त्यांच्याबरोबर शेवटचा कार्यक्रम आम्ही ठाण्याला केला. त्या वेळीही त्यांची प्रकृती फारशी चांगली नव्हती. अधूनमधून काही गोष्टी ते विसरत असत; पण कार्यक्रमात मात्र ते अतिशय सुंदर गायले. मला त्यांची कमालच वाटली. तो कार्यक्रमही अतिशय बहारदार झाला होता. तो अतिशय सुखद अनुभव माझ्या मनात आहे. अर्थात, त्यांच्याबरोबरच्या साऱ्याच कार्यक्रमाच्या स्मृती किंवा त्यांच्याबरोबर व्यतीत केलेल्या साऱ्याच क्षणांची स्मृती अतिशय सुखद आहे. त्या शुक्रताऱ्यासारख्या मनात कायमच अढळपदी राहतील. 

Web Title: singer Arun Date passed away