
Sharad Pawar : 'राज्यातली परिस्थिती चिंताजनक', छ. संभाजीनगर हिंसेप्रकरणी शरद पवार म्हणाले...
मुंबईः बुधवारी मध्यरात्री छत्रपती संभाजी नगरमध्ये दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. काही वाहनंही जाळण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांवर ताशेरे ओढले जात आहे. याप्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे बुधवारी रात्री राडा झाला. दोन गटांमधल्या भांडणात अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली. तसेच दगडफेक देखील करण्यात आली. संतप्त जमावाने पोलिसांचे वाहनही जाळले. सध्या शहरामध्ये तणापूर्ण शांतता आहे.
हेही वाचाः महिलांनो तरुणपणी घेतलेली जमीन उतारवयात होईल आधार
शरद पवार हे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलतांना त्यांनी छत्रपती संभाजी नगरमधील घटनेवर भाष्य केलं. ते म्हणाले की, राज्यातली आताची परिस्थिती पाहाता चिंता वाटायला लागली आहे. बुधवारी घडलेल्या घटनेला धार्मिक स्वरुप आहे का? याबाबत चिंता वाटत आहे. असं म्हणत त्यांनी सध्या राज्यात जे काही घडतंय त्यावर मतं मांडली.
४०० ते ५०० जणांवर गुन्हा दाखल
या घटनेनंतर तब्बल ४०० ते ५०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिनसी पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी १५ गाड्यांचे नुकसान केले आहे. त्यामुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिसांवर हल्ला करणे, दंगा भडकवणे आदी कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी तपासासाठी ८ पथके नियुक्त केले आहेत.
गुप्तचर विभागाचा अहवाल काय म्हणतो?
राज्याचा गुप्तचर विभाग अर्थात एसआयडीने पोलिसांना आधीच सतर्क केलं होतं. नामांतर आणि हिंदू मोर्चामुळे छत्रपती संभाजी नगरमध्ये अस्वस्थता आहे. नामांतरामुळे आपण शांत रहायचं नाही, असंही एका बैठकीत ठरल्याचं एसआयडीने सांगितलं होतं. तरीही पोलिसांनी गांभीर्याने घेतलं नाही. शिवाय घटना घडली तेव्हाही तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल झाले नाहीत, असा आरोप होतोय.