बेदरकार वाहनचालकांचे परवाने निलंबित करणार

सुशांत मोरे
शुक्रवार, 12 मे 2017

मुंबई - बेदरकारपणे वाहन चालवून अपघातांना निमंत्रण देणाऱ्या चालकांचे परवाने निलंबित करण्याची कठोर कारवाई केली जाणार आहे. याबाबतच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या तीन सदस्यीय समितीने देशभरातील सर्व परिवहन विभागांना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यात लवकरच विशेष मोहीम राबवली जाईल, अशी माहिती परिवहन विभागातील सूत्रांनी दिली.

नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिस प्रथम दंडाची कारवाई करतात. नंतर गुन्ह्याचे स्वरूप बघून "आरटीओ'कडे हे प्रकरण सोपवले जाते. गुन्ह्याचे गांभीर्य पाहून "आरटीओ' चालकाचा परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात येते. मात्र, अंमलबजावणी कठोरपणे होत नाही.

रस्त्यांवरील अपघातांना आळा बसावा आणि चालकांवर कठोर कारवाई व्हावी, या उद्देशाने साधारण दीड वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने तीन सदस्यांची समिती नेमली. ही समिती देशभरातील सर्व परिवहन विभाग, वाहतूक पोलिस आणि बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेते. यासंदर्भात तीन दिवसांपूर्वी दिल्लीत समितीची बैठक झाली. या वेळी राज्यातील परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारीही हजर होते. या बैठकीत नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांचे लायसन्स निलंबित करण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार राज्यात लवकरच विशेष मोहीम हाती घेऊन कारवाई केली जाणार आहे.

अंमलबजावणीबाबत बैठक
वाहनचालकाचे लायसन्स जास्तीत जास्त तीन महिने निलंबित करण्यात येते. समितीच्या सूचनांनंतर या संदर्भात राज्यातील आरटीओ अधिकाऱ्यांची बैठक होईल. त्या वेळी अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात येईल.

Web Title: sleek driver suspend driving licenses