
Shahajibapu Patil: सोशल मीडियाच्या सेलिब्रिटींनाही ‘डोंगर-झाडी’वाल्या आमदार शहाजी पाटलांची भुरळ
‘बाटली, बाटली काचेची बाटली. आपल्या बापूचा नाद केला तर भल्या-भल्याची फाटली’ असे म्हणत रीलस्टार सूरज चव्हाण यांनी आपल्या हटक्या आवाजामध्ये शहाजी पाटलांवर स्तुतिसुमने उधळली. सूरज चव्हाण यांच्या हटक्या व घोगऱ्या बोलण्याने उपस्थितांमध्ये मात्र एकच हशा पिकला.
‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील...’ या वाक्यामुळे संपूर्ण राज्यात चर्चेत आलेले सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांची आता सोशल मीडिया व टेलिव्हिजनवरील सेलिब्रिटींनाही भुरळ पडल्याचे दिसून येत आहे. ‘महाराष्ट्राचा छोटा पुढारी’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या घनश्याम दराडे व रीलस्टार सूरज चव्हाण यांनी सांगोला येथे आमदार शहाजी पाटील यांची भेट घेऊन दोघांनीही आमदार पाटलांवर स्तुतिसुमने उधळली.
घनश्याम दराडे व सूरज चव्हाण यांनी आमदार शहाजी पाटलांची भेट घेऊन त्यांच्यासोबत गप्पागोष्टीही केल्या. यावेळी छोटा पुढारी दराडे म्हणाला, ‘आपल्या अस्सल गावरान बोली आणि रांगड्या भाषेमुळे महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या आमदार शहाजी पाटलांचे भाषण आपण सर्वांत आधी ऐकतो. त्यानंतर आपण राज्यातील अन्य मंत्री आणि नेत्यांची भाषणे ऐकतो.
आज टेलिव्हिजन आणि यू-ट्यूबसारखी माध्यमे सुरू केल्यास सगळीकडे राजकीय आरोप- प्रत्यारोप केल्याचे व्हिडिओ आणि विविध राजकीय नेत्यांची भाषणे पाहायला- ऐकायला मिळतात. परंतु, या सर्व व्हिडिओंमध्ये आपण शोधून आमदार शहाजी पाटलांचे व्हिडिओ सगळ्यात आधी पाहतो.
त्यांची बोलण्याची पद्धत, भाषेवर असलेले प्रभुत्व, त्यांची अस्सल गावरान बोलीभाषा आणि आवाजाची लकब आपल्याला प्रचंड आवडते. ज्यांना आजवर केवळ टेलिव्हिजन आणि यू-ट्यूबवर पाहिले त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा योग आला. खरोखरच आमदार पाटील जितके आकर्षक भाषण करतात त्याहूनही त्यांचे व्यक्तिमत्त्व साधे आणि प्रभावी असल्याचेही यावेळी दराडेने नमूद केले.
दरम्यान, अत्यंत कमी वयात आपल्या अलौकिक भाषण कलेमुळे राज्यभर ‘छोटा पुढारी’ अशी ओळख मिळवलेल्या घनश्याम दराडे या चिमुकल्याची राज्यातील अनेक मातब्बर नेतेमंडळींनी दखल घेतली आहे. परंतु ज्याला संपूर्ण महाराष्ट्र छोटा पुढारी म्हणून ओळखतो तोच घनश्याम दराडे मात्र सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांचे व्हिडिओ पाहून भाषणाचे धडे गिरवतो, हे ऐकून आमदार शहाजी पाटील यांनी घनश्यामला जवळ बोलावून त्याचे कौतुक केले आणि त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.