सासू-सुनेच्या वादाला सोशल मीडियाचा 'तडका'

भगवान वानखेडे
शनिवार, 12 जानेवारी 2019

महिला तक्रार निवारण कक्षाकडे येणाऱ्या 30 ते 40 टक्के प्रकरणांत सोशल मीडियाचा अति वापर असल्याचे दिसून आले. तेव्हा सोशल मीडियाचा वापर शक्‍यतोवर टाळून पती-पत्नी या दोघांनीही एकमेकांना वेळ द्यावा, तेव्हाच कलह कमी होऊन संसार सुरळीत राहील. 

- उज्ज्वला वाकपंजर, पोलिस उपनिरीक्षक, मतनी प्रमुख 

अकोला : "स्वयंपाक करता येत नाही', "सुनेची वागणूक चांगली नाही', "सासू क्षुल्लक कारणावरून छळ करते', या आणि अशा अनेक कारणांवरून पूर्वी सासू-सुनेमध्ये खटके उडायचे. मात्र आता यांत्रिक व तंत्रज्ञान युगात सासू-सुनेच्या बहुतांश वादाचे कारण सोशल मीडिया असल्याचे येथील महिला तक्रार निवारण कक्षामध्ये आलेल्या प्रकरणांवरून पुढे आले आहे. 

सोशल मीडियामुळे पसस्परांशी संवाद कमी झाला असल्याची सध्याची स्थिती आहे. यामुळे संसारात पती-पत्नीमधील विश्‍वासार्हता कमी होत आहे. यातूनच संशयाचे भूत बळावत असल्याचे बहुतांश प्रकरणांवरून समोर आले आहे. "मुलगा कामावर जातो, मग सून मोबाईलवर कोणाशी बोलते?', अशा प्रकारचा संशय सासू सुनेवर घेत असल्याने बहुतांश वेळी दोघींमध्ये खटके उडतात.

यावरून आपण विभक्त राहू असा हट्ट अनेक महिला पतीकडे करतात, तर दुसरीकडे सुनांबद्दल संशय घेणाऱ्या सासवाही महिला तक्रार निवारण कक्षाची पायरी चढत आहेत. एकूण सुखी संसारामध्ये सोशल मीडिया विघ्न ठरत असल्याची सद्यःस्थिती समोर येत आहे. 

सोशल मीडियाचा वापर मर्यादित करावा. मोफत मिळणारे कोणतेही ऍप्स डाउनलोड करून नका, सोशल मीडियामुळे फायदा कमी आणि तोटा अधिक आहे. 

- सीमा म. दाताळकर, सहायक पोलिस निरीक्षक (सायबर गुन्हे) 
 

Web Title: Social Media might Increases Family Clashes Sometimes