समाजात अशांतता पसरविण्याचा प्रयत्न - प्रकाश आंबेडकर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 जून 2018

मुंबई - देशात आरक्षणवादी आणि आरक्षणविरोधी असा संघर्ष निर्माण करण्याचा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रयत्न आहे. या संघटनांनी जाणीवपूर्वक समाजात अशांतता पसरविण्याचा प्रयत्न चालवला आहे, असा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. पोटनिवडणुकांत भाजपचा पराभव झाल्यानेच असा प्रयत्न सुरू असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांना गुरू मानतात, त्या संभाजी भिडे यांना दंगल घडविण्याच्या आरोपाखाली अटक करणे सोडून एल्गार परिषदेच्या समर्थकांना अडकविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

एल्गार परिषदेचे संयोजक माजी न्या. पी. बी. सावंत आणि न्या. कोळसे-पाटील यांच्याशी चर्चाही न करता एल्गार परिषदेत सहभागी झालेल्यांना दंगलखोर ठरवले जात आहे. या परिषदेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे सांगत त्यांना अटक केली जात आहे, असे आंबेडकर म्हणाले.

पंतप्रधानांना जिवे मारण्याची धमकी असलेले पत्र अलीकडेच जाहीर झाले आहे. त्याबाबत आश्‍चर्य व्यक्‍त करत आंबेडकर यांनी या पत्राच्या सत्यतेबद्दल संशय व्यक्‍त केला. हे पत्र सत्य असल्यास, तसेच पंतप्रधानांना धमक्‍या आल्या असल्यास त्यांच्या सुरक्षेत वाढ केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली.

पुरावे उघड करा
एल्गार परिषदेला नक्षलवाद्यांकडून आर्थिक मदत मिळाली असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. त्यांच्याकडे तसे पुरावे असल्यास ते उघड करावेत, असे आव्हानही आंबेडकर यांनी दिले. पोलिसांनी कथित नक्षलवादी म्हणून अटक केलेल्या कार्यकर्त्यांकडून जप्त केलेले डिजिटल पुरावे, पत्रे उघड करण्याची मागणीही त्यांनी केली.

Web Title: Social unrest by BJP prakash ambedkar politics