
राज्यातील निराधारांना समाज कल्याण विभागाचा आधार; ११९७ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य
पुणे : राज्यातील निराधार व्यक्तींना समाज कल्याण विभागाचा आधार मिळाला आहे. सामाजिक न्याय विभागाने निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत १ हजार १९७ कोटींचा निधी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे.
हा निधी लाभार्थ्यांना तत्काळ वाटप करावा, असे निर्देश सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिले आहेत. संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन या दोन्हीही योजनांमधून लाभार्थ्यांना दरमहा वेळेवर अनुदान मिळावे, यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत ४४५ कोटी तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेतर्गत ७५२ कोटी असा एकूण १ हजार १९७ कोटींचा निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना सामाजिक न्याय विभागाने वितरित केला आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत किमान १८ ते ६५ वर्षांखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांग, क्षयरोग, कर्करोग, एचआयव्ही, कुष्ठरोग पीडित पुरुष-महिला, निराधार विधवा आदींना लाभ मिळतो. या योजनेसाठी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा २१ हजार रुपयांपर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.
या योजनेखाली पात्र लाभार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जाते. तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेमधून दारिद्र्य रेषेखालील यादीच्या कुटुंबातील ६५ वर्षे आणि त्यावरील पात्र लाभार्थ्यास दरमहा एक हजार रुपये अर्थसाहाय्य देण्यात येते.

या दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांना तातडीने अर्थसाहाय्य वितरित होण्यासाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी नियोजन करावे. राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेला निधी लाभार्थी व्यक्तींना तातडीने वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- सुमंत भांगे, सचिव- सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग