UPSC : सोलापूरचा हर्शल भोसले 'आयईएस'मध्ये टॉपर!

Harshal-Bhosale-Solapur
Harshal-Bhosale-Solapur

मंगळवेढा : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या केंद्रीय अभियांत्रिकी परीक्षेत (आयईएस) तालुक्‍यातील तांडोर येथील हर्शल ज्ञानेश्‍वर भोसले यांनी पहिल्या प्रयत्नात देशात प्रथम क्रमांक मिळविला.

स्थापत्य अभियांत्रिकीच्या 161, यंत्र अभियांत्रिकीच्या 136, विद्युतच्या 108 व अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी शाखेच्या 106 जागा रिक्त आहेत. यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे लेखी परीक्षा घेण्यात आली. उत्तीर्ण उमेदवारांचा सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यात मुलाखतींचा टप्पा पार पडल्यानंतर आयोगाच्या संकेतस्थळावर नुकताच निकाल जाहीर केला. यामध्ये हर्शल यांनी देशपातळीवर प्रथम क्रमांक पटकाविला. 

हर्षल भोसले यांच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यशाने तांडोर गावचे नाव आता देशभर पोचले आहे. हर्षल यांची परिस्थिती तशी हलाखीची. आई कमल भोसले यांनी पतीच्या निधनाचे दुःख बाजूला ठेवत आपले कुटुंब सावरले. पाच मुली व दोन वर्षांच्या मुलासह संसाराचा गाडा हाकला. मोलमजुरी करीतच त्यांनी मुलास उच्च शिक्षण दिले. तोच मुलगा आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी परीक्षेत देशात पहिला आला आहे. 

तालुक्‍यातील पूर्व भागात असलेल्या आणि नदीकाठी वसलेल्या तांडोर येथे कमल भोसले या पतीसह पाच मुली व एका मुलासह मोलमजुरी करून जीवन जगत होत्या. एका मुलीचे लग्न झाल्यावर आजारापणामुळे पतीचे निधन झाले. अशा परिस्थितीत प्रपंच कसा करावा, हा प्रश्न त्यांच्या समोर होता. साडेतीन एकर जमीन कसण्यास कोणी नसल्यामुळे त्यांनी ती पडीक ठेवली होती. 

कमल भोसले यांना राहायलादेखील नव्हते घर 

ग्रामपंचायतीमुळे केंद्र शासनाच्या इंदिरा आवास घरकुल योजनेतून सन 2011-12 मध्ये त्यांना निवारा उपलब्ध झाला. पुढे इतर मुलींची लग्नं त्यांनी थाटात लावून दिली. मुलगा हर्षलनेदेखील आईने घेतलेल्या त्या कष्टाचे चीज केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस (आयईएस) परीक्षेत हर्षलने पहिल्या प्रयत्नात यश मिळविले. 

मी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मुलाला उच्चशिक्षित केले. मी केलेल्या प्रयत्नाचे मुलांनी चीज केले. मुलाने मिळविलेले यश पाहण्यासाठी आज त्याचे वडील असायला हवे होते. 
- कमल भोसले, हर्षल यांच्या आई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com