Vidhan Sabha 2019 : ‘वेट अँड वॉच’मुळे संभ्रम

Vidhan Sabha 2019 : ‘वेट अँड वॉच’मुळे संभ्रम

विधानसभा 2019 
पक्षांतराची लाट सोलापूर जिल्ह्यात अद्याप कायम असल्याने, अनेक नेते निर्णयाप्रत न पोचल्याने राजकीय वातावरण अस्थिर आणि बेभरवशाचे आहे. युतीचे उमेदवार ठरल्यानंतरच काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर होतील, असे चित्र आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील दहा ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना संभाव्य युतीच्या उमेदवारीवर विरोधकांचे उमेदवार ठरणार आहेत. केवळ सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या भूमिकेनंतर चित्र स्पष्ट होईल. जिल्ह्यातील अनेक नेते ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. 

युतीकडे इच्छुकांची भाऊगर्दी आहे. जिल्ह्यातील अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे (काँग्रेस), मंगळवेढा-पंढरपूरचे आमदार भारत भालके (काँग्रेस) आणि माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे (राष्ट्रवादी) हे तिघेही भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे तिन्हीही मतदारसंघात अस्थिरतेचे वातावरण आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. ते शिवसेनेच्या वाटेवर आहेत. सांगोल्यात अर्धशतकाहून अधिक काळ आमदार असलेले गणपतराव देशमुख यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतलाय. त्यांचा वारसदार कोण? यावर युतीच्या उमेदवाराचा निर्णय होईल.

माळशिरस (राखीव) मतदारसंघातील चित्र या वेळी वेगळेच असेल. मोहिते-पाटील सांगतील तो भाजपचा उमेदवार असेल. विरोधकांची ताकद येथे नगण्यच राहील. सिंचन क्षमता वाढविल्याने माढ्यातून पाच वेळा निवडून आलेल्या बबनदादा शिंदे यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवारच मिळत नाही. विरोधकातील फूट त्यांच्या फायद्याची ठरते, हा इतिहास आहे. यंदा शिंदे पक्ष बदलणार असल्याने या मतदारसंघाचा आमदार कोण, हे पाहणे औत्सुक्‍याचे असेल.

अक्कलकोटमध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टींनी उमेदवारीसाठी गळ टाकलाय. त्यांना पक्षांतर्गत विरोधक शमवावा लागेल. म्हेत्रेंना भाजपमध्ये घेऊन उमेदवारी देण्याची प्रक्रिया जवळपास संपल्यात जमा आहे. त्यामुळे म्हेत्रे या वेळी अपक्ष लढतील, असा अंदाज आहे. काँग्रेसकडून डॉ. सुवर्णा मलगोंडा यांचे नाव चर्चेत आहे. मूळचे दुधनीचे आणि कलबुर्गीचे माजी महापौर संतोष पाटील यांचीही तयारी सुरू आहे. 

सोलापूर शहर मध्यमधून काँग्रेसच्या 
आमदार प्रणिती शिंदे यांना विरोधकांसह स्वपक्षीयांसोबत चार हात करावे लागतील. ज्येष्ठ नेते ॲड. यू. एन. बेरिया यांनी मुस्लिम समाजास, तर महापालिकेतील माजी सभागृह नेता देवेंद्र भंडारे यांनी मोची समाजास उमेदवारीची मागणी केली आहे. मुस्लिमबहुल असलेल्या या मतदारसंघातून एमआयएमतर्फे फारुक शाब्दींना उमेदवारी जाहीर झाली आहे. 

गतवेळी एमआयएम दुसऱ्या क्रमांकावर होता. शहर उत्तरमध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना पक्षांतर्गत विरोध मोठ्या प्रमाणावर आहे. ॲड. मिलिंद थोबडे यांचे नाव सर्वमान्य उमेदवार म्हणून पुढे येतंय. भाजपने उमेदवार बदलल्यास अथवा सर्वपक्षीय विरोधी उमेदवार म्हणून त्यांचा विचार होऊ शकतो. शहर मध्यमधून माजी आमदार दिलीप मानेंना शिवसेनेने उमेदवारी दिल्यास महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे शिवसेनेला जय महाराष्ट्र करून शहर उत्तरमधून लढण्याची शक्‍यता आहे.

दक्षिण सोलापूरमध्ये तगडा विरोधक नसल्याचा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना फायदा आहे. परंतु विकास कामांचा डंका पिटूनही ‘लोकमंगल’ सोडूनही ‘लोकमंगल’च्या नावे झालेले गैरप्रकार, जुळे सोलापुरातील जागा, आरक्षित ठिकाणी बांधलेल्या बंगल्याचे प्रकरण, दूध भुकटीप्रकरणी दाखल गुन्हा यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागेल, असे दिसते. युती झाल्याचा मोठा फायदा मोहोळ मतदारसंघामध्ये होणार हे निश्‍चित! राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात पक्षाकडून ६२ जण इच्छुक आहेत. शिवसेनेतून प्रबळ इच्छुकांमध्ये नागनाथ क्षीरसागर, मनोज शेजवाल, 

अर्जूनराव वाघमारे अशी मोठी यादी आहे. उमेदवारी मिळो न मिळो रिंगणात क्षीरसागर परिवारातील सदस्य राहणार हे निश्‍चित! बार्शीत दिलीप सोपल (शिवसेना), तर राजा राऊत (अपक्ष) अशी पारंपरिक लढत ठरलेलीच आहे. करमाळ्यात शिवसेना  उमेदवार बदलण्याच्या विचारात आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या रश्‍मी बागल यांना उमेदवारी देण्याचा शब्द दिल्याने आमदार नारायण पाटील अस्वस्थ आहेत. परंतु कोणत्याही परिस्थितीत ते रिंगणात राहणारच! 

मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात आमदार भारत भालके यांच्या भूमिकेमुळे अस्थिरता आहे. शिवसेनेच्या शैला गोडसेंनी दोन-तीन वर्षांत कामांचा झपाटा लावलाय. पक्ष असो नसो तरीही निवडणूक लढविणार असा सूर समाधान आवताडेंचा आहे. ज्येष्ठ नेते व माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनीदेखील मैदानात उतरण्याची चालवली आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनीही कंबर कसली आहे.

प्रचारात गाजणारे मुद्दे
    कृष्णा-भीमा स्थिरीकरण.
    बोरामणी येथील विमानतळाचे काम.
    होटगी रस्त्यावरील विमानतळावरून उड्डाण.
    उद्योगधंद्यात वाढ होण्याची गरज.
    कुर्डूवाडीतील रेल्वे बोगी निर्मिती कारखान्याची पुनर्बांधणी.
    नमामी चंद्रभागा, तीर्थक्षेत्र विकासाची रखडलेली कामे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com