पाऊले चालती तुळजापूरची वाट...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

सोलापूर - 'आई राजा उदो उदो... सदानंदीचा उदो उदो'चा गजर करीत सोलापूर परिसरातून आणि कर्नाटकातून तुळजापूरला दोन लाखांहून अधिक भाविक पायी निघाले आहेत. उद्या (गुरुवारी) कोजागिरी पौर्णिमा असल्याने तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मंगळवारी रात्रीपासूनच भाविकांचा पायी प्रवास तुळजापूरच्या दिशेने चालू झाला आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर पायी जाणारे भाविक दिसत होते.

तुळजापूरच्या शारदीय नवरात्रोत्सवातील देवीची प्रक्षाळ पूजा आणि छबीना मिरवणूक कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री असते. यामध्ये सामील होण्यासाठी सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड या जिल्ह्यांसह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून सुमारे दोन लाखांहून अधिक भाविक तुळजापुरात दाखल झाले आहेत. पायी जाणाऱ्या भाविकांमुळे दोन दिवसांपासून सोलापूर-तुळजापूर रस्ता गर्दीने फुलला आहे. कर्नाटक आणि सोलापूर जिल्ह्यातील भाविकांची संख्या अधिक होती. मात्र आज शहरातील भाविकांची त्यात भर पडली. सोलापूरपासून तुळजापूरपर्यंत प्रचंड मानवी साखळीचे दृश्‍य बुधवारी दुपारी दिसत होते. या भाविकांसाठी रस्त्यावर विविध संस्था आणि व्यक्तींच्या वतीने चहा, नाश्‍ता, फराळाची व्यवस्था केली होती. पहाटे घर सोडलेल्या भाविकांनी रस्त्याशेजारील शेतात विहिरीवर स्नान केले. अनेक जण टप्प्याटप्प्यावर विसावा घेऊन मार्गस्थ होत होते.

गर्दीत युवक-युवती, महिला आणि पुरुष असे सर्व स्तरांतील भाविक सहभागी होते. काही जण नवस फेडण्यासाठी लहान बाळ हातावर आडवे घेऊन जात होते. तरुणांची संख्या जास्त असून, ते डोक्‍यावर पट्टी बांधून भवानी मातेचा जयघोष करीत पुढे निघाले आहेत. पोलिस यंत्रणाही संरक्षणासाठी दोन दिवसांपासून तैनात आहे. जुना तुळजापूर नाक्‍यापासून वाहनांना प्रवेश बंद केला आहे.

वाहतूक वळविली
सोलापूर ते तुळजापूर मार्गे मराठवाड्याकडे जाणारी वाहतूक नळदुर्गमार्गे वळविली आहे. मार्गावर आयुक्तालयाने पोलिसांचे तात्पुरते तंबू उभारले आहेत. आयुक्तालयाच्या हद्दीनंतर ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.

Web Title: solapur maharashtra news kojagiri pournima tuljapur