जलविद्युत प्रकल्पांमध्ये २५८५ मेगावॉटची क्षमता

संतोष सिरसट 
बुधवार, 28 जून 2017

जलविद्युत निर्मिती क्षमता
कोयना (१९६०), वैतरणा (६०), येलदरी (२२.५०), वीर (नऊ), राधानगरी (४.८०), भाटघर (१६), पैठण (१२), पानशेत (आठ), तिल्लारी (६६), भीरा (८०), पवना (१०), कण्हेर (चार), वरसगाव (आठ), भातसा (१५), धोम (दोन), उजनी (१२), माणिकडोह (सहा), डिंभे (पाच), वारणा (१६), तेरवान मेढे (०.२), सूर्या (सहा), दूधगंगा (२४), भंडारदरा (४४). 

सोलापूर - राज्यातील २४ जलविद्युत प्रकल्पांमधून दोन हजार ५८५ मेगावॉट वीजनिर्मिती होते. विशेषतः उन्हाळ्यात मागणी वाढण्याच्या काळात हेच प्रकल्प तिच्या पूर्ततेसाठी मदत करतात.

निसर्गामध्ये उपलब्ध साधनांचा आधार घेत धरणांची निर्मिती केली गेली. धरण बांधण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे. ती बांधतानाच त्यामध्ये ऊर्जानिर्मितीची रचना केली जाते. त्यानंतर ऊर्जानिर्मितीसाठी प्रकल्प महानिर्मिती कंपनीकडे हस्तांतरित होतो. वेगवेगळ्या माध्यमांमधून उपलब्ध वीज ‘महावितरण’ला दिली जाते. त्यांच्या माध्यमातून ती वीज ग्राहकांपर्यंत पोचविली जाते. सध्या सरकारने सौर ऊर्जा प्रकल्पांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे. सौर प्रकल्पांच्या उभारणीसाठी मोठा खर्च येत असला, तरी भविष्यात या ऊर्जास्रोतांचा वापरावर भर आहे. प्रकल्प उभारणीनंतर त्यासाठी फारसा खर्च येत नाही.

सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून जवळपास एक हजार ९६० मेगावॉट जलविद्युत निर्मिती होते. एकाच प्रकल्पातील ही राज्यातील सर्वांत जास्त जलविद्युत निर्मिती आहे. ज्या त्या धरणाच्या क्षमतेवर ही निर्मिती अवलंबून आहे. धरणामध्ये पाणी कमी असताना लेक टॅपिंग करून त्यांची क्षमता वाढवली जाते. त्याने विद्युतनिर्मितीही वाढते. 

राज्यातील २४ धरणांच्या माध्यमातून जलविद्युत निर्मिती केली जाते. मात्र, या पुढील काळातील प्रवास हा सौरऊर्जेकडे वाटचाल करणारा असेल.
- महेश आफळे, जनसंपर्क अधिकारी, महानिर्मिती

छोट्या प्रकल्पांकडे लक्ष
सरकार आता मोठ्या जलविद्युत प्रकल्पांपेक्षा छोट्या जलविद्युत प्रकल्पांकडे लक्ष केंद्रित करत आहे. त्यासाठी प्रस्तावही आले आहेत. राज्यात ५१.७ मेगावॉटचे अशा प्रकारचे १५ प्रस्ताव शासनाकडे आले आहेत.

Web Title: solapur news Hydro Power Project