योजनांना शेतकऱ्यांचा प्रतिसादच नाही 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

सोलापूर - राज्य सरकारमार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात असून, या योजनांसाठी निधीही उपलब्ध करून दिला जात आहे. कृषी विभागाच्या प्रमुख योजनांसाठी जवळपास 590 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. मात्र, कृषी विभागाच्या योजनांना शेतकऱ्यांचा प्रतिसाद नसल्याचे चित्र दिसून येते. 

सोलापूर - राज्य सरकारमार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात असून, या योजनांसाठी निधीही उपलब्ध करून दिला जात आहे. कृषी विभागाच्या प्रमुख योजनांसाठी जवळपास 590 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. मात्र, कृषी विभागाच्या योजनांना शेतकऱ्यांचा प्रतिसाद नसल्याचे चित्र दिसून येते. 

कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेतला नाही, अशा शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी ज्या शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून संबंधित योजनेच्या लाभाकरिता पूर्वसंमती दिलेली आहे, अशा शेतकऱ्यांनी संबंधित घटकांची अंमलबजावणी करून तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अनुदान मागणी करणे गरजेचे आहे. सर्व योजनांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येत आहे. 

शेतकऱ्यांनी घटकांची अंमलबजावणी करून अनुदानाची मागणी केली आहे; परंतु त्यांना अनुदान मिळण्यास काही अडचणी निर्माण झाल्या असतील, तर त्या शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात farmerhelp2017@gmail.com ई-मेलवर, 18002334000 या टोल फ्री क्रमांकावर किंवा 9423440066 या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे तक्रार करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 

योजनानिहाय उपलब्ध निधी 
सरकारकडून "प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने'अंतर्गत रुपये 367 कोटी, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेडनेट व पॉलिहाउसच्या उभारणीसाठी साठी 50 कोटी रुपये, कांदा चाळ उभारणीसाठी 50 कोटी, शेततळे अस्तरीकरणासाठी 25 कोटी आणि कृषी यांत्रिकीकरणासाठी 98 कोटी असा एकूण जवळपास 590 कोटी रुपयांचा निधी सरकारने उपलब्ध करून दिला आहे. मात्र, त्याला शेतकऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. 

कृषी विकासाच्या योजनांबाबत शेतकऱ्यांच्या काही सकारात्मक सूचना असल्यास त्याही आम्हाला पाठवाव्यात. त्या सूचनांचा योग्य प्रकारे विचार केला जाईल. 
बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

Web Title: solapur news scheme farmer