पत्रास कारण की...; खेळाच्या तासिका परत मिळाव्यात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

खेळ खेळल्याने शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती होते. मन एकाग्र होऊन ग्रहणक्षमता वाढल्याने अभ्यासही चांगला होतो. त्यामुळे शासनाने तासिका कमी करण्याऐवजी वाढविणे गरजेचे आहे. कला, क्रीडा विषयांच्या तासिका पूर्ववत करण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार असून शिक्षणमंत्री व मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. 
- अण्णा हजारे 

सोलापूर - शाळेतील कला, क्रीडा विषयांचे तास कमी केल्याने राज्यभर याविरोधात आंदोलनाच्या रूपाने क्रीडाशिक्षकांनी एल्गार पुकारला असताना, त्यात आता राज्यातील विद्यार्थी खेळाच्या तासिका परत मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साद घालणार आहेत. राज्यभरातून विद्यार्थ्यांनी अशी पत्रे पाठवण्यास सुरू केले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर व सोलापूर क्रीडाशिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष जितेंद्र पवार यांनी दिली. 

ते म्हणाले, ""एप्रिलच्या शिक्षण विभागाच्या परिपत्रकाने शाळेतील कला, क्रीडा विषयांचे तास कमी केल्याने याचा दूरगामी परिणाम शिक्षण व्यवस्थेवर होणार आहे. त्यामुळे हा विषय शिकवणारे राज्यातील कला, क्रीडा शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. शासन एकप्रकारे विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करणाऱ्या विषयाच्या तासिका कमी करून शिक्षणव्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत असून कमी केलेल्या तासिका पूर्ववत होण्यासाठी शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. यामुळे राज्यातील क्रीडाशिक्षक त्या-त्या जिल्ह्यात क्रीडाशिक्षक समन्वय समिती स्थापन करून आंदोलन करीत आहेत. परंतु, राज्य शासनाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने या समितीने शालेय क्रीडा स्पर्धांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आता राज्यभरातील विद्यार्थी खेळाच्या तासिका परत मिळाव्यात म्हणून मुख्यमंत्री फडणवीस आणि शालेय क्रीडामंत्री विनोद तावडे यांना पत्र पाठवणार आहेत. या मोहिमेला नगर येथून प्रारंभही झाला असून अनेक विद्यार्थ्यांनी पत्रे पाठवली आहेत. 

"चला उठा... आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याकडून पत्र लिहून घ्या...पोस्टकार्डसाठी लागणारे दोन, पाच रुपये खर्च होऊ द्या. परंतु, महाराष्ट्रातून लाखो पत्रांचा भडिमार मंत्र्यांवर झालाच पाहिजे', असे म्हणत अनेकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला आहे. 

मा. देवेंद्रजी फडणवीस, 
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य 

विषय - आमच्या खेळाच्या तासिका परत मिळणेबाबत. 
मा. मुख्यमंत्री साहेब, 

या जगात आम्ही जन्म घेतला, तेव्हा आम्ही निश्‍चळ दगडाप्रमाणे होतो. या दगडाला आकार देण्याचे काम माझ्या घरातील सर्वांनी केले. परंतु, दगडाच्या मूर्तीत खऱ्या अर्थानं जीव ओतून तिला सजीव केले ते माझ्या शिक्षकांनी. शिक्षक हा देव जरी नसला तरी माझ्यासाठी देवापेक्षा कमी नाही. पण, मागील काही वर्षांपासून या देवदूतावर आपण घाला घालत आहात. त्यामुळे आमच्यासारख्या खेडोपाड्यातील, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांवर भविष्यात शिक्षणापासून दूर राहण्याची वेळ येणार असून, शिक्षणापासून वंचित राहणारा तरुण भविष्यात चोऱ्या, दरोडे घालून देशोधडीला निश्‍चित लागेल. शाळेत जो आम्हाला आरोग्याचा मंत्र व सुदृढ भारताचे तंत्र-मंत्र शिकवून आमच्या रोजच्या जीवनात आनंद निर्माण करतो, त्या क्रीडाशिक्षकांवर (देवदूतावर) तुम्ही शारीरिक शिक्षण विषयाच्या तासिका कमी करून अन्याय करत नाहीत, तर आमचे बालपण, आमचा आनंद हिरावून घेत आहात. त्यामुळे कला, क्रीडा विषयांच्या तासिका पूर्ववत करून "सुदृढ भारताचे' स्वप्न साकार करण्यासाठी मदत करा, हीच कळकळीची विनंती. 

आपला विद्यार्थी 

Web Title: solapur news student sports Devendra Fadnavis