प्राथमिक शिक्षक संपाच्या तयारीत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

सोलापूर - राज्यातील सुमारे पाच लाख प्राथमिक शिक्षकांनीही संपावर जाण्याची तयारी सुरू केली आहे. त्याबाबतच्या पोस्ट सोशल मीडियावर पसरल्या आहेत. सरकारचा 27 फेब्रुवारीचा बदलीचा आदेश रद्द करावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. 

सोलापूर - राज्यातील सुमारे पाच लाख प्राथमिक शिक्षकांनीही संपावर जाण्याची तयारी सुरू केली आहे. त्याबाबतच्या पोस्ट सोशल मीडियावर पसरल्या आहेत. सरकारचा 27 फेब्रुवारीचा बदलीचा आदेश रद्द करावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. 

राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षास 15 जूनपासून सुरवात होत आहे. नेमक्‍या त्याच दिवसापासून शिक्षक संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. 15 जूनला राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा विचार ते करत आहेत. 16 जूनला राज्यातील सर्व पंचायत समितीमधील शिक्षण विभागाला टाळे ठोकण्याचा त्यांचा विचार आहे. 17 जूनला रास्ता रोको करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 18 जूनला महाराष्ट्र बंद करण्याबाबतही शिक्षक संघटनांमध्ये विचार सुरू आहे. 

शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांच्या संदर्भात काढण्यात आलेला 27 फेब्रुवारीचा आदेश रद्द करावा, 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तिवेतन योजना सुरू करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा संप केला जाणार आहे. शिक्षकांनी या संपाची तयारी करताना ग्रामसेवकांशी तुलना केली आहे. ग्रामसेवक आपल्या मागण्यांसाठी संप करतात, त्याचप्रमाणे शिक्षकही आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी संपाचे हत्यार उपसण्यावर विचार करत आहेत. 

शिक्षक नेत्यांकडून प्रतिसाद मिळावा 
राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या अध्यक्षांशी चर्चा करून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यातील सर्व शिक्षक नेत्यांचा याला सकारात्मक प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षाही सोशल मीडियावरील या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

Web Title: solapur news teacher strike